वॉशिंग्टन – युरेनियम समृद्धीचे प्रमाण आम्ही 2015 च्या अणु कराराच्या मर्यादेपेक्षा ओलांडले आहे अशी घोषणा इराणने केल्यानंतर अमेरिकेने त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या संबंधात इराणला इशारा देताना म्हटले आहे की तुम्ही आगीशी खेळत आहात. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायानेही इराणवर जोरदार आगपाखड केली आहे. इराणवर बहिष्कार घाला आणि त्यांच्यावर कडक निर्बंध लागू करा अशी सुचना इस्त्रायलने युरोपियन समुदायाला केली आहे. इराणने अणु कराराच्या मर्यादा ओलांडू नयेत अशी सुचना संयुक्तराष्ट्रांनीही त्यांना केली आहे.
इराणवर समृद्ध युरोनियमची तीनशे किलोंची मर्यादा घालण्यात आली होती. पण त्यांनी ती मर्यादा ओलांडली आहे. दरम्यान आमच्यावर आणखी निर्बंध लादले आणि आमच्या तेल विक्रीला मर्यादा घातली तर आम्ही या प्रकरणात आणखीही आगळीक करू अशी भूमिका इराणने घेतली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला कोणतीही भिक घातली नाही. आम्ही आधीच इराणला युरेनियम समृद्धीकरणाला अनुमती द्यायला नको होती असे अमेरिकेने म्हटले आहे. इराणने समृद्ध युरेनियमचा साठा वाढवून प्रादेशिक शांतता धोक्यात घातली असल्याची टीका अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पओ यांनी दिला आहे.