#IPL2019 : पंजाबचा दणदणीत विजय

-मुंबईचा आठ गडी राखून पराभव
-ख्रिस गेल आणि लोकेश राहुलची चमकदार कामगिरी

मोहाली -गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर ख्रिस गेल, लोकेश राहुल आणि मयंक अग्रवालने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सचा आठ गडी आणि आठ चेंडू राखून सहज पराभव करत स्पर्धेत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 176 धावांची मजल मारून पंजाबसमोर विजयासाठी 177 धावांचे आव्हान ठेवले.

प्रत्युत्तरात खेळताना पंजाबने धडाक्‍यात सुरुवात केली. सलामीला आलेला लोकेश राहुल आणि ख्रिस गेलने आक्रमक फलंदाजी करत दुसऱ्याच षटकांत 2 षटकार मारले. याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये 300 षटकार मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. पॉवर प्ले संपल्यानंतर गेलने आपला गेअर बदलला. त्याने अधिक आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो हार्दिक पांड्याकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 24 चेंडूत 40 धावा केल्या यात 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे.

ख्रिस गेल बाद झाल्यावर आलेल्या मयंक अग्रवालने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. यामुळे 10 व्या षटकांतच पंजाब 85 धावांवर पोहोचला. मयंकने 204 च्या स्ट्राईक रेटने 21 चेंडूत 43 धावा केल्या. पण, त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. कृणाल पांड्याने त्याला बाद करत मुंबईला मोठा दिलासा दिला. मयंक बाद झाल्यानंतर सावध खेळी खेळणाऱ्या राहुलने आपला जम बसल्यानंतर धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने मिलरच्या साथीने पंजाबला 15 व्या षटकांत 140 पर्यंत पोहचवले. राहुलने 45 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत पंजाबला विजयीपथावर नेले. त्याने 57 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे पंजाबने मुंबईचे 177 धावांचे लक्ष्य 8 विकेट आणि 8 चेंडू राखत पार केले.

तत्पूर्वी, मोहालीच्या पाटा खेळपट्टीवर मुंबईने आपल्या डावाची दमदार सुरुवात करत पहिल्या पाच षटकांमध्ये संघाचे अर्धशतक झळकावले. यामध्ये कर्णधार रोहितने 18 चेंडूत 32 धावा करत मोलाचा वाटा उचलला पण, त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. त्याला व्हिलजोनने पायचीत केले. 5 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल्जोएनने चेंडू फेकला. हा चेंडू रोहितच्या पॅडवर आदळला आणि पंचानी त्याला बाद ठरवले. याबाबत रोहितने नॉन स्ट्राईक असलेल्या डी कॉकला विचारणा केली. पण त्याने रिव्ह्यू घेऊ नये असे सुचवले आणि गोंधळामुळे मुंबईच्या संघाने रोहितची विकेट गमावली.

तर त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव लागोपाठ तिसऱ्यांदा अपयशी ठरला. यादवला केवळ 11 धावाच करता आल्या. यादव बाद झाल्यानंतर आलेल्या युवराज आणि क्विंटन डिकॉकने मुंबईचा डाव सावरला. डिकॉकने आक्रमक फलंदाजी करत मुंबईची धावगती चांगली राखण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या बाजूने युवराज सिंग एकेरी आणि दुहेरी धाव घेत त्याच्या सोबत भागिदारी वाढवण्यावर भर देत होता. या दोघांनी 11 व्या षटकांत संघाचे शतक स्कोरबोर्डवर लावले. पण, ही जोडी फार काळ टिकली नाही.

आक्रमक फलंदाजी करणारा डिकॉक 39 चेंडूत 60 धावा करून माघारी परतला. यानंतर पंजाबचा लेगस्पिनर मुरगन अश्‍विनने टिच्चून मारा करत युवराजला चांगलेच सतवले. अखेर 18 धावांवर युवराजला बाद करत त्याने मुंबईला मोठा धक्का दिला. युवराज बाद झाल्यावर मुंबईच्या धावगतीला ब्रेक लागला. पोलार्डलाही फार काही करता आले नाही. तो 9 चेंडूत 7 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या पांड्याबंधूंनी मुंबईला 150च्या पार पोहचवले. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यायांनी अखेरच्या दोन षटकांमध्ये फटकेबाजी केली त्यामुळे मुंबईने 20 षटकांत 7 बाद 176 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –

मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 7 बाद 176 (क्विंटन डी कॉक 60, रोहित शर्मा 32, हार्दिक पांड्या 31, एम अश्‍विन 2-25, मोहम्मद शमी 2-42), पराभुत विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब 18.4 षटकांत 177 (लोकेश राहुल नाबाद 71, मयंक अग्रवाल 43, ख्रिस गेल 40, कृणाल पांड्या 2-43).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)