#IPL2019 : पंजाबने विजयाचे खाते उघडले

जयपूर  -ख्रिस गेल आणि सर्फराज खानने केलेल्या फटकेबाजीनंतर पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव करत आपल्या विजयाचे खाते उघडून आगेकूच केली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 184 धावांची मजल मारत राजस्थान समोर विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना राजस्थानने वेगवान सुरुवात केली. यावेळी राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणेने पहिल्याच षटकांत सॅम करनला 3 चौकार लगावत राजस्थानला धडाकेबाज सुरुवात करून दिली.

तर, दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या जोस बटलरनेही फटकेबाजी करत रहाणेच्या साथीत पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली. या दोघांनी सहा षटकांच्या पॉवर प्ले दरम्यान राजस्थानला 64 धावांची मजल मारून दिली. तर दोघांनी 8 षटकांत 78 धावांची सलामी दिल्या नंतर कर्णधार अश्‍विनने रहाणेला बाद करत ही भागीदारी फोडत राजस्थानला पहिला धक्‍का दिला.

अजिंक्‍य बाद झाल्यावर आलेल्या सॅमसन आणि बट्‌लरने राजस्थानचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. बट्‌लरने आपला आक्रमणाचा धडका कायम ठवला. त्याने 47 चेंडूत 69 धावा चोपल्या होत्या. पण, अश्‍विनने तो नॉन स्ट्राईकरला असताना वादग्रस्तरित्या धावबाद केले. त्यानंतर राजस्थानचा डाव गडगडायला सुरुवात झाली. पहिल्यांदा स्मिथचा लोकेश राहुलने अप्रतिम झेल पकडला. पाठोपाठ संजु सॅमसनही 30 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्‍स आणि त्रिपाठीही मोठा शॉट मारण्याच्या नादात बाद झाले. यानंतर राजस्थानच्या इतर फलंदाजांनी केवळ हजेरीवीराची भूमिका बजावल्याने राजस्थानला 20 षटकांत 9 बाद 170 धावा करता आल्या.

तत्पूर्वी, खराब सुरुवातीनंतर ख्रिस गेल आणि मयंक अग्रवाल यांनी पंजाबचा डाव सावरताना 56 धावांची भागीदारी करत पंजाबला अर्धशतकी वेस ओलांडून दिली. मयंक बाद झाल्यानंतर ख्रिस गेलने सर्फराज खानच्या साथीत पंजाबची धावगती वाढवत पंजाबला 17व्या षटकांत 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. यावेळी गेल शतक करणार असे वाटत असताना 79 धावांवर तो बाद झाला. गेल बाद झाल्यानंतर सर्फराजने फटकेबाजी करत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)