#IPL2019 : काश्मिरच्या रसिक सलामचे आयपीएलमधे पदार्पण

मुंबई- मुंबईने यंदाच्या आयपीएलमधील आपला पहिला सामना गमावला असला तरी युवराज सिंग आणि काश्‍मिरी खेळाडू रसिक सलाम खेळाडूंमुळे आजच्या सामन्याची विशेष चर्चा झाली.

मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्‍लेनघन, बेन कटींग, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या असे गोलंदाजीचे एकापेक्षा एक पर्याय आहेत. त्या मुंबई संघात जम्मू काश्‍मीरच्या रसिक सलाम दार या 17 वर्षांच्या तेज गोलंदाजाने या संघातून आयपीएल पदार्पण केले. काश्‍मीरमधील राजकीय, सामाजिक स्थिती अस्थिरच आहे. या राज्यात अवघे एक मैदान आहे, जिथे टर्फच्या खेळपट्टीवर क्रिकेटपटूंना सरावाची संधी मिळते.

रसिकचा प्रवास जिल्ह्यास्तरीय क्रिकेट, जम्मू काश्‍मीरच्या 19 वर्षांखालील संघ ते यंदा विजय हजारे करंडकाचा सीनियर संघ असा झाला आहे. हजारे स्पर्धेतील दोन लढतीत त्याने तीन बळी मिळवले. कूच बिहार करंडकाच्यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला हेरले. त्याला चाचणीसाठी बोलावण्यात आले आणि लिलावाच्या दिवशी त्याच्या नावाला मुंबई इंडियन्सने दिलेली पसंती पाहून रसिकसह त्याच्या कुटुंबालाही सुखद धक्काच बसला.

जम्मू-काश्‍मीरमध्ये खासगी स्तरावर बरझामा प्रीमियर लीगचे आयोजन होते, ज्यात आत्मविश्वास मिळाल्याचे एका वेबसाइटवरील मुलाखतीत रसिकनेच सांगितले. जम्मू-काश्‍मीरचा कर्णधार परवेझ रसूलने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रसुलनंतर सलाम हा दुसरा काश्‍मिरचा खेळाडू ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)