#IPL2019 : चेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर’ विजय

चेन्नई – फलंदाज आणि गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा आठ धावांनी पराभव करत आगेकूच केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 175 धावांची मजल मारून राजस्थानसमोर विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले. पाठलाग करायला उतरलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्‍य रहाणे, संजू सॅमसन आणि जोस बटलर लागोपाठ परतल्याने राजस्थानने अवघ्या 3 षटकांत 14 धावांमध्ये 3 फलंदाज गमावले.

त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठी आणि स्टिव्ह स्मिथने राजस्थानचा डाव सावरला. त्रिपाठीने आक्रमक फलंदाजी करत धावगतीही वाढवली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागिदारी केली. त्रिपाठी बाद झाल्यानंतर स्मिथ देखील 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर बेन स्टोक्‍स आणि जोफ्रा आर्चर यांनी फटकेबाजी करत काही काळ राजस्थानच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. मात्र, ब्राव्होने अखेरच्या षटकांत बेन स्टोक्‍स आणि श्रेयस गोपालला बाद करत राजस्थानला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 167 धावांवर रोखत सामना आठ धावांनी आपल्या नावे केला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची पहिल्या पाच षटकांमध्येच 3 बाद 27 अशी अवस्था झाली होती. यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरण्यासोबतच भागिदारी करण्यावर आपला भर दिला. त्यामुळे त्यांची धावगती खालावली. मात्र, सुरेश रैनाने फटकेबाजी करत 32 चेंडूत 36 धावा करत धोनी सोबत 8.5 षटकांत 61 धावांची भागिदारी नोंदवली.

यानंतर ड्‌वेन ब्राव्होला साथीत घेत धोनीने चेन्नईचा डाव सावरला. चेन्नईची धावगती वाढवण्यासाठी ब्राव्हो आणि धोनीने फटकेबाजी करत 4.5 षटकांमध्ये 56 धावांची भागिदारी केली. यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात ब्राव्हो बाद झाला. ब्राव्हो बाद झाल्यानंतर धोनीने आपला गिअर बदलत जयदेव उनाडकटच्या अखेरच्या षटकांत तब्बल 28 धावा वसूल करत चेन्नईला 175 धावांची मजल मारून दिली. यावेळी धोनीने 46 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावांची खेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)