मोहाली, दि. 8 -लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा एक चेंडू आणि सहा गडी राखून पराभव करत आगेकूच नोंदवली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 150 धावांची मजल मारत पंजाबसमोर विजयासाठी 151 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पंजाबची सुरूवात खराब झाली. सलामीवीर ख्रिस गेल केवळ 16 धावा करुन परतल्यानंतर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवालने 114 धावांची भागिदारी करत पंजाबचा विजय जवळ पास निश्चीत केला.
मात्र विजयासाठी 16 धाव अबाकी असताना मयंक 55 धावा करुन परतल्यावर पंजाबचा डाव चांगलाच अडचणीत सापडला होता. मात्र, राहुलने अखेरपर्यंत खेळत पंजाबला विजय मिळवून दिला. यावेळी लोकेश राहुलने नाबाद 71 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरूवात खराब झाली. बेअरस्ट्रो 1 धाव करुन बाद झाल्याने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्यांना केवळ 27 धावांची तर 10 षटकांत 50 धावांचीच मजल मारली होती. यावेळी वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात विजय शंकर 26 धावा करुन परतला. तर, बढती मिळालेला मोहम्मद नबी देखील लवकर परतला.
यावेळी सावध फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरने फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण करत मनीष पांडेच्या साथीत हैदराबादला शतकी मजल मारुन दिली. तर, पांडे देखील मोठा फटका मारण्याच्या नादात परतल्यानंतर आलेल्या दीपक हूडाने तीन चेंडूत 14 धावा फटकावत हैदराबादला 150 धावांची मजल मारून दिली. यावेळी वॉर्नरने नाबाद 70 धावांची खेळी केली.