#IPL2019 : पंजाबचा राजस्थानवर विजय

मोहाली  – फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा 12 धावांनी पराभव करत आगेकूच केली.

यावेळी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 182 धावांची मजल मारत राजस्थानसमोर विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना राजस्थानला 20 षटकांत 170 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांनी सामना 12 धावांनी गमावला.

प्रत्युत्तरात उतरलेल्या राजस्थानने दमदार सुरुवात केली. यावेळी जोस बटलर आणि राहुल त्रिपाठीने 38 धावांची सलामी दिल्यानंतर बटलर 23 धावा करून परतला. यानंतर त्रिपाठीने सजू सॅमसनच्या साथीत राजस्थानचा डाव सावरला. मात्र, सॅमसन 27 धावा करून परतला. त्यानंतर त्रिपाठी आणि अजिंक्‍य रहाणे यांनी फटकेबाजी करत राजस्थानला शंभरी ओलांडून दिली.

मात्र, आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्रिपाठी बाद झाल्यावर राजस्थानच्या डावाला गळती लागल्याने धावा आणि चेंडूंमधील अंतर वाढत गेले. मात्र, यावेळी आलेल्या स्टुअर्ट बिन्नीने 11 चेंडूत 31 धावा फटकावून राजस्थानच्या विजयाच्या आशा जागृत केल्या. मात्र, राजस्थानला 20 षटकांत 170 धावांचीच मजल मारता आली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाबने वेगवान सुरुवात केली. यावेळी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पंजाब संघाने सावध खेळी करायला सुरुवात केली. जयदेव उनाडकतला सलामीवीर ख्रिस गेलने दोन षटकार ठोकत पंजाबला धमाकेदार सुरुवात करून देत 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्य मदतीने 30 धावांची खेळी करून लोकेश राहुलच्या साथीत 38 धावांची सलामी देऊन तो परतला.

गेल बाद झाल्यानंतर आलेल्या मयंक अग्रवालने फटकेबाजी करत पंजाबला 50 धावांची मजल मारून दिली. त्याने गोपालच्या गोलंदाजीचाही खरपूस समाचार घेत आठव्या षटकात 13 धावा वसुली केली. मात्र, त्यानंतरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. यानंतर, लोकेश राहुलने डेव्हिड मिलरच्या साथीत फटकेबाजी करत पंजाबची खालावलेली धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राहुलने 47 चेंडूत 52 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण करत पंजाबला दीडशतकी मजल मारून दिली. मात्र, अर्धशतकानंतर लागलीच तो परतला. तर, यावेळी दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करणारा मिलरही 27 चेंडूत 40 धावा करून परतल्यानंतर आलेल्या कर्णधार अश्‍विनने 4 चेंडूत 1 चौकार आणि 2 षट्‌कारांच्या मदतीने 17 धावा करत पंजाबला 182 धावांची मजल मारून दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)