#IPL2019 : दिल्ली कॅपिटल्सचा ‘सुपर’ विजय

नवी दिल्ली – दिल्लीच्या पृथ्वी शॉची धमाकेदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या टिच्चून माऱ्यामुळे सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा तीन धावांनी पराभव करताना स्पर्धेत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलाकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 185 धावांची मजल मारत दिल्लीसमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना दिललीच्या संघाला देखील निर्धारित 20 षटकांत 185 धावांचीच मजल मारता आल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यावेळी सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने एका षटकांत 10 धावा करत कोलकातासमोर विजयासाठी 11 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, कोलकाताला एका षटकांत केवळ सातच धावा करता आल्याने त्यांना तीन धावांनी पराभूत व्हावे लागले.

तत्पूर्वी कोलकाताने दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना दिल्लीने आक्रमक सुरुवात केली. शिखर धवनने आक्रमक सुरवात करून दिली. मात्र, तो 16 धावा करून परतल्यानंतर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉने दमदार फलंदाजी करत 11 व्या षटकांत दिल्लीचे शतक बोर्डावर लावले. पृथ्वी शॉने अर्धशतकी खेळी करत कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याला अय्यरने चांगली साथ देत 42 धावा केल्या. मात्र, तो आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉने फटकेबाजी करत 16 व्या षटकात दिल्लीला 150 धावांचा टप्पा गाठून दिला.

मात्र, आक्रमक खेळ करण्याच्या नादात पृथ्वी शॉ 55 चेंडूत 99 धावा फटकावून बाद झाला. यानंतर दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत 6 धावांची गरज असताना शेवटच्या षटकांत केवळ 5 धावा करता आल्याने सामना सुपर ओव्हरवर गेला.
तत्पूर्वी, कोलकाताची सुरुवात खराब झाली. दबावात खेळणाऱ्या निखिलला बाद करत लामिच्छानेने कोलकाताला पहिला धक्‍का दिला.

निखिल बाद झाल्यानंतर आलेल्या उथप्पाने आणि ख्रिस लिन, नितीश राणा देखील पाठोपाठ परतल्याने कोलकाताला मोठा धक्‍का बसला. तर, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल धावबाद झाला. यानंतर आलेल्या आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनी कोलकाताच्या डावाला आकार दीला. यावेळी रसेलने केवळ 23 चेंडूत अर्धशतक झळकावले तो बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने फटकेबाजी करत कोलकाताला 185 धावांची मजल मारून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)