#IPL2019 : मुंबईसमोर चेन्नईचे कडवे आव्हान

चेन्नई सुपर किंग्ज Vs. मुंबई इंडियन्स
वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – एम. चिदंबरम्‌ स्टेडियम, चेन्नई

चेन्नई – गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचा शुक्रवारी प्रतिस्पर्धी मुंबईशी सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इदाद्याने चेन्नई उतरणार आहे. तर आतापर्यंत घरच्या झालेल्या पाच सामन्यांत चेन्नईने एकही सामना गमाविलेला नसल्याने मुंबईला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागणार आहे.

चेन्नईने 11 सामन्यांत 8 विजय मिळवित 16 गुणांसह “प्ले ऑफ’मधील आपले स्थान जवळपास निश्‍चित केले आहे. एम. चिदंबरम्‌ स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या सामन्यात विजय मिळवून पहिल्या दोनमध्ये आघाडी घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज मैदानात उतरेल. तर मुंबई 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या चार संघात स्थान मिळविण्यासाठी त्यांना दोन विजयांची आवश्‍यकता आहे.

मुंबईने कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या सत्रातील सामन्यात चेन्नईवर 37 धावांनी विजय मिळविला होता. पण चेन्नईने घरच्या मैदानावर एकही सामना गमाविलेला नसल्याने मुंबईला सरस खेळ करावा लागणार आहे.
चेन्नईने मागील सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत केले होते. या सामन्यात सलामीवीर शेन वॉटसनला चांगली लय सापडली आहे. त्याने 53 चेंडूत 93 धावांची निर्णायक खेळी केली होती. तसेच कर्णधार धोनीही चांगल्या फॉर्मात आहे, पण सलामीवीर फाफ डु प्लेसिसला अद्याप सूर गवसलेला नाही. तर गोलंदाजीची भिस्त हरभजन सिंग, इम्रान ताहिर यांच्यासह दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांच्यावर राहणार आहे.

दुसरीकडे मुंबईला गत सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात मुंबईची फलंदाजी बहरली होती. पण गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे चेन्नईविरुद्ध विजय मिळविण्यासाठी मुंबईला दोन्ही आघाड्यांवर चांगला खेळ करावा लागणार आहे.

तीनवेळाच्या विजेत्या संघाला पुन्हा एकदा सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. तसेच हार्दिक पांड्याही आक्रमक खेळी करू शकतो. तर गोलंदाजीची भिस्त जसप्रीत बुमराहवर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)