IPL 2018 : हैदराबादला रोखण्यासाठी पंजाब सज्ज 

मोहाली – दहा दिवसांच्या पहिल्या टप्प्यानंतर अपराजित राहिलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाची घोडदौड रोखण्याची संघी नव्या रूपात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मिळणार आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आज रंगणाऱ्या या लढतीत सलग चौथा विजय मिळविण्यासाठी हैदराबाद संघ उत्सुक असेल. हैदराबाद संघाने केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली पहिले सलग तीन सामने जिंकून गुणतालिकेत अग्रस्थान मिळविले आहे. प्रामुख्याने गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुले त्यांना ही कामगिरी साधता आली आहे. त्याउलट नवा कर्णधार रविचंद्रन अश्‍विनच्या नेतृत्वाखाली आक्रमक क्रिकेट खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या फलंदाजांनी विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. हैदराबादने तीनही सामने जिंकले असून पंजाबने तीनपैकी दोन सामन्यांत बाजी मारली आहे. 

हैदराबादच्या गोलंदाजांमध्ये स्टार खेळाडूंची नावे नसली, तरी भुवनेश्‍वर कुमार, रशीद खान, बिली स्टॅनलेक, सिद्धार्थ कौल, शकिब अल हसन आणि संदीप शर्मा या गोलंदाजांनी योग्य वेळी बळी घेतानाच प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येवरही नियंत्रण राखले आहे. तसेच हैदराबादच्या फलंदाजांमध्ये कर्णधार केन विल्यमसनसह वृद्धिमान साहा, शिखर धवन आणि मनीष पांडे या नामवंत खेळाडूंसोबत शकिब, दीपक हूडा आणि युसुफ पठाण अशा नावांचाही समावेश आहे. परंतु हैदराबादच्या फलंदाजीची मोठ्या धावसंख्येविरुद्ध खऱ्या अर्थाने परीक्षा झालेली नाही. सलामीच्या लढतीत राजस्थानला 9 बाद 125 धावांवर रोखल्यावर 1 बाद 127 धावा फटकावून विजय मिळविणाऱ्या हैदराबादची मुंबईविरुद्ध केवळ 148 धावांचा पाठलाग करताना मात्र घसरगुंडी झाली होती व त्यांना अखेर केवळ 1 गडी राखून विजयावर समाधान मानावे लागले होते. हैदराबादच्या गोलंदाजांनी कोलकाताला 8 बाद 1138 धावांवर रोखल्यावर फलंदाजांनी सहज विजय मिळवून दिला होता. भुवनेश्‍वरने तीन बळी टिपले होते.

-Ads-

त्याउलट बलाढ्य चेन्नई संघाचा 4 धावांनी पराभव केल्यामुळे पंजाब संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. ख्रिस गेल व लोकेश राहुल यांना सूर गवसल्यामुळे पंजाबच्या फलंदाजीचा प्रश्‍न सुटला आहे. मयंक आगरवाल, करुण नायर आणि अश्‍विन यांच्याकडूनही अपेक्षा करता येणार आहे. पंजाबचा केवळ 17 वर्षे वयाचा फिरकीपटू मुजीब उर रहेमान याने भल्या भल्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे. अश्‍विनचे नेतृत्वही डोळ्यात भरण्यासारखे आहे. त्यामुळेच उद्या होणारी हैदराबाद-पंजाब ही लढत रोमांचकारी होईल, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

प्रतिस्पर्धी संघ- 
किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), अक्षर पटेल, लोकेश राहुल, अँडयू टाय, ऍरॉन फिंच, मार्कस स्टॉइनिस, करुण नायर, मुजीब उर रेहमान, अंकित सिंग राजपूत, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा, बारिंदर सिंग स्रान, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन ड्‌वारशुईस, अक्षदीप नाथ, मनोज तिवारी, मयंक आगरवाल, मंझूर दर, प्रदीप साहू व मयंक डागर.

सनरायजर्स हैदराबाद– केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, कार्लोस ब्रेथवेट, श्रीवत्स गोस्वामी, अलेक्‍स हेल्स, मेहदी हसन, दीपक हूडा, ख्रिस जॉर्डन, शकिब अल हसन, सिद्धार्थ कौल, भुवनेश्‍वर कुमार, महंमद नबी, मनीष पांडे, टी. नटराजन, युसुफ पठाण, रशीद खान, सचिन बेबी, वृद्धिमान साहा, संदीप शर्मा, तन्मय आगरवाल, खलील अहमद, बेसिल थंपी, रिकी भुई, विपुल शर्मा व बिली स्टॅनलेक.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)