मुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामात आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत अखेरच्या क्षणी पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आज होणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान असणार आहे. बंगळुरूने या मोसमात एक विजय व दोन पराभवांचा सामना केला आहे.

आयपीएलच्या दहाव्या मोसमात विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची नव्या मोसमात खराब सुरूवात झाली आहे. या मोसमात मुंबईकडे समतोल संघ असून देखील त्यांना प्रत्येक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई इंडियन्ससाठी पाच, सहा व सातव्या क्रमांकावरील खेळाडूंनी भरीव कामगिरी करणे महत्वाचे आहे. मुंबईकडून या क्रमांकावर अनुक्रमे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि कायरॉन पोलार्ड हे फलंदाजीस येतात. मात्र त्यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता येत नसल्याकारणाने मुंबईला ऐनवेळेस पराभवाला सामोरे जावे लागत आहे.

आयपीएलपूर्वी कृणाल दुखापतग्रस्त असल्याने तो स्थानिक मोसमात खेळू शकला नव्हता. त्याचवेळी हार्दिक दुखापतीशी संघर्ष करीत आहे. त्यामुळे दोघेही आपली भूमिका बजावण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे मुंबईची आठ षटके आणि दोन फलंदाज यावर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे पोलार्डही योगदान देण्यास अपयशी ठरतो आहे. दरम्यान, मुंबईच्या संघाने पुनरागमन करण्यास अधिक वेळ लागू नये, याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

दुसरीकडे बंगळुरूने आपल्या पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले आहेत, तर केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. मुंबईप्रमाणेच त्यांच्या महत्वाच्या खेळाडूंना अजून सूर गवसला नसल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांना गोलंदाजीतही सुधारणा करणे गरजेचे असून त्यांना आपल्या क्षेत्ररक्षणाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्‍स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्‍युलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्‍विन्टन डीकॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम.अश्‍विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे व अनिरुद्ध जोशी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)