IPL 2018 : मुंबईसमोर आज हैदराबादचे कडवे आव्हान

मुंबई  – चांगले खेळाडू असूनही स्पर्धेत सातत्याने अपयशाचा सामना करावा लागलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आज होणाऱ्या सामन्यात या मोसमातील सर्वात समतोल समजल्या जाणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्या संघाचे आव्हान आहे.

चालू हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार असून पहिल्या फेरीच्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा दोन चेंडू राखून पराभव केला होता. या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी मुंबईला केवळ एका सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर हैदराबादने तीन सामन्यात विजय मिळवला असून त्यांना दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मोसमात आतापर्यंत मुंबईने बहुतेक सामने शेवटच्या षटकामध्ये गमावले आहेत. वास्तविक मुंबईकडे जसप्रीत बुमराह, मिचेल मॅकक्‍लॅनेघन, मुस्तफिझुर रेहमान व हार्दिक पांड्या यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे वेगवान गोलंदाज असतानाही त्यांना प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यात अपयश येत आहे. त्यातच त्यांचे गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांना अखेरच्या षटकांमध्ये धावांची खैरात करताना दिसून येत आहेत. रोहित शर्माचे नेतृत्व दडपणाखाली लक्षणीयरीत्या अपयशी ठरले आहे. वैयक्‍तिक अपयशाचेही सावट त्याच्यावर आहे.

फलंदाजीतही मुंबईच्या मधल्या फळीने अपेक्षित कामगिरी केली नसल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. रोहित शर्माला सुरुवातीच्या अपयशानंतर सूर गवसला असला, तरी पाचपैकी केवळ एका सामन्यांत त्याला भरीव कामगिरी करता आली आहे. सूर्यकुमार यादवने गेल्या सामन्यांत अप्रतिम फलंदाजीचे दर्शन घडविताना मुंबईला विजयाची चाहूल दिली होती. परंतु कोणाच्याच कामगिरीत सातत्य नसल्याने मुंबईसमोर समस्या उभ्या आहेत. आजच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवायचा असल्यास त्यांना आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीत लक्षणीय सुधारणा करण्याची गरज आहे.

तर दुसरीकडे हैदराबादने या मोसमात आतापर्यंत समतोल खेळाचे प्रदर्शन केले आहे. परंतु गेल्या दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यातच दुसरा सलामीवीर वृद्धिमान साहाला मालिकेत आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करता न आल्याने त्यांना सलामी जोडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत विजय मिळवायचा असल्यास हैदराबादच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.

सनरायजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, कार्लोस ब्रेथवेट, श्रीवत्स गोस्वामी, अलेक्‍स हेल्स, मेहदी हसन, दीपक हूडा, ख्रिस जॉर्डन, शकिब अल हसन, सिद्धार्थ कौल, भुवनेश्‍वर कुमार, महंमद नबी, मनीषपांडे, टी. नटराजन, युसुफ पठाण, रशीद खान, सचिन बेबी, वृद्धिमान साहा, संदीप शर्मा, तन्मय आगरवाल, खलील अहमद, बेसिल थंपी, रिकी भुई, विपुल शर्मा व बिली स्टॅनलेक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)