नवी दिल्ली – अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली डेअर डेअरडेव्हिल्सला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून केवळ 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्लीचा वेगवान गोलंदाज लियाम प्लन्केट म्हणाला की, या हंगामात आमची सुरुवात चांगली झाली नाही. माझ्या मते आम्ही अजूनही स्पर्धेत पुनरागमन करू शकतो. मात्र त्यासाठी आम्हाला आता केवळ एका विजयाची गरज असल्याचा मला विश्वास आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्याबद्दल प्लन्केट म्हणाला की, लक्ष्याच्या इतक्या जवळ येऊन पराभूत होणे निराशाजनक आहे. आम्ही हा सामना जिंकायला हवा होता. अशा रीतीने सामना गमावणे आम्हा सर्वांसाठी निराशाजनक आहे.
मात्र पुनरागमन करण्यापासून आम्ही केवळ एक विजय दूर आहोत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज केगिसो रबाडाच्या जागी संधी देण्यात आल्यानंतर आयपीएलमध्ये आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या प्लन्केटने आश्वासक कामगिरी करताना 4 षटकांत केवळ 17 धावा देत पंजाबचे तीन फलंदाज बाद केले. या कामगिरीबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून प्लन्केट म्हणाला की, मला आयपीएलमध्ये खेळायला मिळाले आणि मी माझ्या पहिल्याच सामन्यात संघासाठी चांगली कामगिरी करू शकलो, हे अधिक महत्त्वाचे आहे. यापूर्वी मी या मैदानात 2016 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील तीन सामने खेळलो होतो. त्यामुळे येथील खेळपट्टी गोलंदाजांना पोषक असणार हे मला माहीत होते. त्यामुळे आम्ही त्या प्रकारे रणनीती आखली आणि पंजाबला कमी धावसंख्येत रोखण्यात यशस्वी ठरलो.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा