IPL 2018 : दिल्लीचा थरारक विजय, मुंबईचा तिसरा पराभव

मुंबई  – सलामीवीर जेसन रॉयने केलेल्या नाबाद 91 धावांच्या बळावर मुंबईचा सात गडी राखून पराभव करताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आयपीएलच्या नव्या हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने निर्धारित 20 षटकांत सात बाद 194 धावा फटकावल्या. दिल्लीने 20 षटकांत 3 बाद 195 धावा करताना विजयाचे आव्हान पार केले.

अखेरच्या षटकांत 11 धावांची गरज असताना जेसन रॉयने पहिल्या चेंडूवर चौकार व दुसऱ्यावर षटकार लगावून धावसंख्या बरोबरीत आणली. पुढचे तीन चेंडू निर्धाव गेले. मात्र रॉयने अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत दिल्लीला विजयी केले. रॉयने विजयात महत्वपूर्ण वाटा उचलताना 53 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 91 धावा फटकावल्या.

त्याआधी विजयासाठी 195 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीला जेसन रॉयने गंभीरच्या (15) साथीत अर्धशतकी सलामी दिली. गंभीर परतल्यावर रॉयने ऋषभ पंतच्या (47) साथीत 6.3 षटकात 69 धावांची भागीदारी करीत दिल्लीची आगेकूच कायम राखली. तसेच रॉयने श्रेयस अय्यरच्या साथीत (नाबाद 27) 60 धावांची अखंडित भागीदारी करीत दिल्लीला विजयी केले.

तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीवीर एविन लुईस आणि सूर्यकुमार यादव यांनी केवळ 9 षटकांत मुंबईला 102 धावांची सलामी दिली. एविन लुईसने 48 धावा केल्या, तर यादवने 53 धावा करत त्याला सुरेख साथ दिली. यानंतर ईशान किशनने देखील 44 धावांची वेगवान खेळी करत मुंबईचा धावफलक हलता ठेवला. मात्र मधल्या फळीने आजही निराशा केल्याने वेगवान सुरुवात मिळूनही मुंबईची धावसंख्या 194 धावातच रोखली गेली.

संक्षिप्त धावफलक – मुंबई इंडियन्स- 20 षटकांत 7 बाद 194 (एविन लुईस 48, सूर्यकुमार यादव 53, ईशान किशन 44, तेवतिया 36-2, ख्रिश्‍चन 35-2, बोल्ट 39-2) पराभूत विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स- 20 षटकांत 3 बाद 195 (जेसन रॉय नाबाद 91, ऋषभ पंत 47, अय्यर नाबाद 27, कृणाल पांड्या 21-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)