IPL 2018 : दिल्लीसमोर आज कोलकाताचे कडवे आव्हान

नवी दिल्ली  – आयपीएलच्या अकराव्या मोसमातील तीन आठवडे पूर्ण होत असताना गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना मालिकेत संतुलित कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रंगणार आहे.

सामन्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या असून संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने कर्णधारपदाचा त्याग केला आहे. त्यामुळे संघ कठीण परिस्थितीत असताना कर्णधारपदाची जबाबदारी नवख्या श्रेयस अय्यरवर येऊन पडली असल्याने दिल्लीसह त्याचीही कसोटी लागणार आहे.

आयपीएलच्या या मोसमामध्ये दिल्लीचा संघ आतापर्यंत 6 सामने खेळला असून त्यात त्यांना पाच पराभवांचा सामना करताना केवळ एक विजय मिळविता आला आहे, दुसरीकडे गौतम गंभीरलाही सूर गवसलेला नाही. 6 सामन्यांतील 5 डावांत त्याने केवळ 85 धावा केल्या आहेत. यामुळेच गंभीरने कर्णधारपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर हा पूर्णपणे माझा निर्णय असल्याचे त्याने सांगितले.

कर्णधार म्हणून संघासाठी आवश्‍यक असलेले योगदान मी देऊ शकलो नाही. म्हणून अपयशाची जबाबदारी स्वीकारून मी कर्णधारपद सोडत आहे. या निर्णयासाठी हीच योग्य वेळ आहे, असे गंभीरने म्हटले आहे. परंतु त्याच्या राजीनाम्यामुळे दिल्लीसमोरील समस्या संपणार नसून त्यात भरच पडण्याची चिन्हे आहेत. दिल्लीच्या नावावर केवळ दोन गुणांची नोंद असून उरलेल्या आठ सामन्यांत आणखी दोन पराभव झाल्यासही त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल.

    आयपीएलच्या चालू मोसमात दिल्लीकडे श्रेयस अय्यर, गौतम गंभीर, ऋषभ पंत, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, कॉलिन मन्‍रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, यांसारखे तगडे फलंदाज, तसेच अमित मिश्रा, शाहबाज नदीम, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट यांसारखे दर्जेदार गोलंदाज असतानाही दिल्लीला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर दुसरीकडे सहापैकी तीन सामन्यात विजय व तीन सामन्यात पराभवाचा सामना करत गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या कोलकाताने मोसमाच्या सुरुवातीपासून समतोल कामगिरी केली आहे.

त्यातच त्यांचा कर्णधार दिनेश कार्तिक, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राणा हे फलंदाज फॉर्मात असून गोलंदाजांपैकी सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला हे गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. उद्याचा सामना जिंकायचा असल्यास दिल्लीला आपल्या गोलंदाजीत खूपच सुधारणा करण्याची गरज आहे. तर कोलकाताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना जबाबदारीची जाणीव असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे.

  प्रतिस्पर्धी संघ-

दिल्ली डेअरडेव्हिल्स –  गौतम गंभीर (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, केगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तवेतिया, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन मन्‍रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरतसिंग मान, आवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कालरा, संदीप लामिचाने, सायन घोष.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राना, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरॉन डेलपोर्ट, जावोन सिरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी व टॉम करन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)