IPL 2018 : गौतम गंभीरने सोडले दिल्लीचे कर्णधारपद

  मानधनाची 2.80 कोटी रुपये रक्‍कमही परत करणार

नवी दिल्ली – आयपीएलच्या यंदाच्या सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून गौतम गंभीरने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली संघ सहा सामन्यांत पाच पराभवांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. केवळ एका सामन्यात त्यांना निसटता विजय मिळविता आला आहे. संघाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारताना गंभीरने आपल्या मानधनाची 2.80 कोटी रुपये ही संपूर्ण रक्‍कमही परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलमध्ये एखाद्या कर्णधाराने मानधन परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच गंभीर दिल्ली संघातून उरलेले सर्व सामने खेळणार असला, तरी त्यासाठी कोणतेही मानधन स्वीकारणार नाही. गौतम गंभीरला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. सहा सामन्यांत त्याला केवळ 85 धावा करता आल्या आहेत. त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यातच गंभीरला आपल्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाला विजय मिळवून देण्यात सातत्याने अपयश येत असल्याने त्याने कर्णधारपद सोडले असून त्याच्या या निर्णयामुळे दिल्लीच्या संघाची अवस्था आणखीनच गंभीर झाली आहे.

आतापर्यंत दिल्लीच्या संघाने जी काही कामगिरी केली आहे, त्याची जबाबदारी कर्णधार या नात्याने मी स्वीकारतो आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मी कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोलकाताचे नेतृत्व स्वीकारताना मी 28 वर्षांचा होतो. आता मी 36 वर्षांचा आहे. त्यामुळे कदाचित मला दडपणाचा सामना करणे सोपे जात नसेल. या निर्णयामुळे मी माझ्या फलंदाजीकडे अधिक लक्ष देऊ शकेन, असे गंभीरने राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच क्रिकेटमधील भवितव्याबद्दल आयपीएलनंतर निर्णय घेणार असल्याचेही त्याने नमूद केले.

गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरवर दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविेण्यात आली आहे. 23 वर्षीय श्रेयस अय्यर हा वरच्या फळीतील फलंदाज असून त्याने दोन अर्धशतके झळकावल्यानंतरही दिल्लीला दोन्ही सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. श्रेयस अय्यर संघाचा नवीन कर्णधार असेल. माझ्या मते आगामी सामन्यात चांगला खेळ केला, तर आम्ही अजूनही स्पर्धेत कायम राहू शकतो, असे सांगून गंभीर म्हणाला की, सलग पराभवांनंतर मी एकट्याने शांतपणे विचार केला. मी जर कर्णधारपदाचे दडपण सहन करू शकत नसेन, तर त्या पदावर राहणे योग्य नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)