IPL 2018 : कोलकात्याचा राजस्थानशी आज निर्णायक सामना 

एलिमिनेटर लढतीत पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात 
कोलकाता – आयपीएलच्या अकराव्या मोसमातील साखळी सामने संपले असून बाद फेरीतील चार संघ निश्‍चित झाले आहेत. बाद फेरीतील दुसरा “एलिमिनेटर’ सामना कोलकाता विरुद्ध राजस्थान यांच्या दरम्यान होणार असून यातील विजेत्या संघाचा “क्‍वालिफायर-2′ सामना बाद फेरीतील पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या संघाविरुद्ध शुक्रवारी होणार आहे. कोलकाताने आपल्या 14 सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थानला आपल्या चौदा सामन्यांपैकी सात सामन्यांत विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघ चालू मोसमात यापूर्वी दोन वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोन्ही सामन्यात कोलकाताने राजस्थानचा एकतर्फी पराभव करत वर्चस्व गाजवले होते. यंदाच्या मोसमात कोलकाताचा संघ सुरुवातीच्या काही विजयानंतर काही सामन्यांमध्ये पराभूत होत गेल्यामुळे त्यांचा संघ दडपणात आला होता. अशा वेळी संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने आपले नेतृत्वगुण पणाला लावून संघाला संकटातून बाहेर काढले. त्यामुळे कोलकाता 16 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला तर राजस्थानने अनपेक्षित पुनरागमन करत 14 गुणांसह बाद फेरीत स्थान मिळवले.

कोलकाताने आतापर्यंत आपल्या खेळाडूंच्या समतोल कामगिरीमुळे चांगले यश मिळवले असून त्यांच्या सलामीवीरांनी बहुतेक वेळा संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. तसेच मधल्या फळीतील फलंदाजांनीही संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कोलकाताकडून आतापर्यंत चार फलंदाजांनी 300च्या वर धावा केल्या आहेत, तर तीन गोलंदाजांने 10 पेक्षा जास्त विकेट्‌स घेतल्या आहेत. राजस्थाननेही यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी नोंदवली असून लागोपाठ पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या राजस्थानला बेन स्टोक्‍स आणि जोस बटलर या इंग्लंडच्या जोडगोळीने विजयी मार्गावर परतवले होते. मात्र दोघांनाही स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागल्याने राजस्थान संघ अडचणीत आला आहे. हैदराबाद विरुद्धच्या साखळी सामन्यात राजस्थानने आपल्या फिरकी गोलंदाजांच्या बळावर विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. त्यांच्याकडून आतापर्यंत तीन फलंदाजांनी 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तर तीन गोलंदाजांनी 10 पेक्षा जास्त विकेट्‌स घेतल्या आहेत.

कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांकडे कोणत्याही परिस्थितीतून पुनरागमन करत सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. कोलकाताकडे दिनेश कार्तिक, नितीश राणा, रॉबिन उथप्पा आणि ख्रिस लिनसारखे फलंदाज, तसेच सुनील नारायण आणि आंद्रे रसेल सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याच बरोबर मोक्‍याच्या क्षणी संघाला बळी मिळवून देणारे कुलदीप यादव, पियुष चावला यांसारखे गोलंदाजही त्यांच्याकडे आहेत. राजस्थानकडे संजू सॅमसन, अजिंक्‍य रहाणे, हेन्‍रिच क्‍लासेनसारखे तगडे फलंदाज आहेत तर कृष्णप्पा गौतम, श्रेयस गोपालसारखे आवश्‍यकतेच्या वेळी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याच बरोबर जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकत व बेन लाफलिन सारखे फलंदाजांवर अंकुश ठेवणारे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.

प्रतिस्पर्धी संघ – 
कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राना, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरॉन डेलपोर्ट, जावोन सिरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी व टॉम करन.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजू सॅमसन, बेन स्टोक्‍स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डीआर्की शॉर्ट, दुश्‍मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस. मिथुन, जयदेव उनाडकत, बेन लाफलिन, प्रशांत चोप्रा, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, जतिन सक्‍सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्‍रिच क्‍लासेन, झहीर खान आणि राहुल त्रिपाठी.
सामन्याचे ठिकाण- कोलकाता. सामन्याची वेळ- सायंकाळी 7 पासून. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)