IPL 2018 : कॅप्टन कूल धोनीने दिले संघभावनेला विजयाचे श्रेय 

किती वाईट परिस्थितीतून विजय मिळविता येतो हे माहीत असणे महत्त्वाचे 
मुंबई – सहा बाद 62 आणि सात बाद 92 अशी अवस्था असताना चेन्नईच्या समस्त पाठीराख्यांनी विजयाची आशा सोडली होती. हैदराबादच्या पाठीराख्यांनी तर केव्हाच विजयोत्सवाला सुरुवात केली होती. परंतु मैदानावर फाफ डु प्लेसिस आणि मैदानाबाहेर महेंद्रसिंग धोनी हे दोघेच कमालीचे शांत दिसत होते. खेळपट्टीवर डु प्लेसिस धुमाकूळ घालत असताना कॅप्टन कूल धोनीच्या चेहऱ्यावरील हास्य कधीच लोपले नव्हते. धोनीच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्‍वास अखेर खरा ठरला.

दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने “क्‍वालिफायर-1′ लढतीत हैदराबाद सनरायजर्स संघावर 2 गडी राखून थरारक विजय मिळवून आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. चमत्कार वाटावा अशा या विजयाचे श्रेय धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणाला दिले. गेल्या दहा वर्षांपासून आमचा संघ चांगल्या दर्जाचाच आहे. परंतु खेळाडू किती चांगले आहेत, यापेक्षा त्यांचा एकमेकांवर किती विश्‍वास आहे हे अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगून धोनी म्हणाला की, कर्णधार कितीही चांगला असला, तरी तुम्ही सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या योगदानाशिवाय काहीच करू शकत नाही.

हैदराबादच्या गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणेच अप्रतिम कामगिरी बजावली, असे सांगून धोनी म्हणाला की, भुवनेश्‍वर आणि रशीद यांनी उत्कृष्ट मारा केला. लागोपाठ बळी गमावल्यामुळे आमच्यावर दडपण होतेच. शिवाय हैदराबादकडे एक मिस्टरी गोलंदाज होता. सगळे काही संपले आहे असे दिसत असताना मिळविलेला हा विजय निश्‍चितच आनंददायक आहे. परंतु पराभव झाला असता, तरी आम्हाला आणखी एक संधी होती. त्यामुळे आम्ही जिंकलो यापेक्षा आपण किती वाईट परिस्थितीतून पुनरागमन करू शकतो हे आम्हाला समजले आणि त्यालाच महत्त्व होते.

चेन्नईचा हा विजय म्हणजे एक चमत्कारच होता. आयपीएलच्या या मोसमात फाफ डु प्लेसिस सपशेल अपयशी ठरला होता. परंतु चेन्नईला जेव्हा सर्वाधिक गरज भासली, तेव्हा अफलातून खेळी करताना त्याने पराभवाच्या खाईतून चेन्नईच्या विजयाची पताका फडकावली. 15 षटकांत 7 बाद 92 अशी निराशाजनक अवस्थेतून डु प्लेसिसने केवळ 42 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 67 धावा फटकावून चेन्नईचा विजय साकारला.
विशेष म्हणजे वॉटसन, रैना, रायुडू, धोनी आणि ब्राव्हो हे सगळे प्रमुख फलंदाज तंबूत परतले असताना डु प्लेसिसने दीपक चाहर, हरभजन सिंग आणि शार्दूल ठाकूर या गोलंदाजांना हाताशी घेऊन हैदराबादचे सर्व प्रयत्न धुळीला मिळविले. तीन षटकांत 43 धावांचे लक्ष्य असताना डु प्लेसिसने ब्राव्होच्या एका षटकांत 20 धावा फटकावून चेन्नईच्या विजयाचा रस्ता मोकळा करून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)