IPL 2018 : औपचारिक लढतीत आज दिल्लीसमोर चेन्नईचे आव्हान 

चेन्नईला प्ले-ऑफसाठी सरावाची संधी 
नवी दिल्ली – चांगला संघ असूनही अनपेक्षित पराभवांच्या मालिकेमुळे आयपीएलच्या अकराव्या हंगामात गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासमोर आज होणाऱ्या औपचारिक लढतीत याआधीच बाद फेरीत पोहोचलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे आव्हान आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत औपचारिक असली, तरी प्ले-ऑफ फेरीपूर्वी चेन्नईला सरावाची नामी संधी या सामन्यातून मिळणार आहे.

आयपीएलचा यंदाचा हंगाम संपत आला आहे. दिल्लीचा संघ सर्वांत अगोदर स्पर्धेतून बाद झाला असून हंगामातील आपल्या 12 सामन्यांपैकी त्यांना केवळ तीन सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर तब्बल नऊ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीलाच कर्णधार बदल तसेच महंमद शमीसारखा अनुभवी गोलंदाज दुखापतग्रस्त होणे, पुन्हा नवा कर्णधार संघात सामील होणे, या व अशा अनेक कारणांमुळे दिल्लीचा संघ संपूर्ण साखळी स्पर्धेत झगडताना दिसला आहे.

त्यातच दिल्लीचे केवळ एक ते दोनच खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात मिळूनही मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याने मोठे लक्ष्य ठेवण्यात दिल्लीला अपयश आले. तसेच काही सामन्यांत गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे त्यांना आपले आव्हान राखण्यात अपयश आले. त्यातच नियमित कर्णधार गौतम गंभीरने अपयशाची जबाबदारी स्वीकारून स्पर्धा अर्ध्यावर अली असताना राजीनामा दिल्यामुळे दिल्लीला हादरा बसला. त्यानंतर श्रेयस अय्यरसारखा युवा खेळाडू कर्णधारपदी विराजमान झाल्याने त्याच्या अनुभवाच्या कमतरतेचाही फटका दिल्ली संघाला बसला आहे. दिल्लीकडून आतापर्यंत ऋषभ पंतने 12 सामन्यांत सर्वाधिक 582 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्टने 15 बळी मिळविताना सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कोलकातासारखा संघ सोडून दिल्लीचे कर्णधारपद स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरला मात्र यंदाच्या मोसमानंतर निवृत्तीचे वेध लागले आहेत. गंभीरसारख्या खेळाडूच्या निवृत्तीमुळे विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघातील आणखी एक खेळाडू मैदानावरून एक्‍झिट घेणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ- 
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसिस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, दीपक चाहर, के.एम.आसिफ, कनिष्क सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर व एन. जगदीशन.

दिल्ली डेअरडेव्हिल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत, गौतम गंभीर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तवेतिया, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन मन्‍रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरतसिंग मान, आवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कालरा, संदीप लामिचाने, सायन घोष.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)