खासगी बस थांब्यामुळे अपघातांना निमंत्रण

वाईत पोलिसांच्या वरदहस्तामुळे खासगी बसेस सुसाट

वाई –
येथील बसस्थानकापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गावर जुन्या बस स्थानकासमोर रस्त्याच्या दुतर्फा खासगी बसेस उभ्या राहत असून यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अनधिकृत पणे उभ्या असलेल्या या खासगी बसेसना वाई पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा शहरात होत आहे. नव्याने वाई पोलीस ठाण्याचा कारभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे या अनागोंदी घटनेकडे गांभीर्याने पाहणार का? असा सवाल वाईकरांनी उपस्थित केला आहे.

पाचगणी महाबळेश्‍वरला जाणारे बहुतांश पर्यटक हे वाईमधून जात असतात. रोज हजारो वाहने सुरुर-पोलादपूर या राज्य महामार्गावरून धावत असतात. वाई हे तालुक्‍याचे ठिकाण असून प्रसिद्ध महागणपती मंदिरामुळे वाईलाही दररोज हजारो भाविक दर्शनाला येत असतात. एकूणच वाई हे वर्दळीचे ठिकाण असल्याने. वाहतुकीची कोंडी हा तर नित्याचा भाग बनलेला आहे. रस्त्यालगतची वाढती अतिक्रमणे ही एक नवी डोकेदुखी निर्माण करणारी आहे. अशा पार्श्‍वभूमीवर वाई बसस्थानकापासून शंभर मीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात खासगी बसेस कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे उभ्या असतात.

खासगी बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या परिसरात रात्रीची मोठी गर्दी झालेली असते. नुकतेच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसवण्यात आले आहेत. यामुळे येणारा व जाणारा मार्ग स्वतंत्र करण्यात आला आहे. पुणे मुंबई व अन्य राज्यातून पाचगणी व महाबळेश्‍वरला येणारे पर्यटक याच मार्गाचा वापर करीत असून रोज हजारो वाहने या रस्त्यावरून सुसाट धावत असतात. मात्र खासगी बसेस मालकांनी येथे आपला अड्डा केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेकवेळा या ठिकाणी लहान मोठे अपघातही झाले आहेत. या बेकायदा खाजगी बसेस थांब्या संदर्भात वाई पोलिसांकडे सातत्याने तक्रारी झाल्या आहेत. परंतु या बेकायदा बस थांब्यावर ठोस उपाययोजना पोलिसांकडून आतापर्यंत करण्यात आली नाही. पोलीस या बेकायदा बस थांब्यावर कारवाई का करत नाहीत याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दररोज या ठिकाणी रात्री दहा वाजेपर्यंत दहा ते बारा बससेस उभ्या असतात यामुळे इतर ये-जा करण्याऱ्या वाहनांना अक्षरशः कसरत करून वाहन चालवावी लागत आहेत. समोरून येणारी वाहन चालकाला दिसत नाहीत. शिवाय प्रवाशी व त्यांना सोडण्यासाठी आलेले नातेवाईक ही रस्त्यावर गर्दी करून उभे आसतात. त्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे. वाई बस स्थानकासमोर ही दिवसभर खासगी वाहने उभी असतात यामुळं याठिकाणी वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे.

एक वाहतूक पोलीस कर्मचारी या परिसरात दिवसभर ये-जा करत असतो वडाप चालकाशी गप्पा मारत बसलेला असतो. त्याला इथे उभे असलेली खासगी वाहने; वाहतुकीची कोंडी का दिसत नाहीत ? असा प्रश्‍न वाईकरांनी उपस्थित केला आहे. पोलीस निरीक्षक खोबरे यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता आहे. अपघात झाल्यावर पोलीस कारवाई करणार का? रोज पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना हा बेकायदा थांबा का दिसत नाही? असे प्रश्‍न वाईकरांनी उपस्थित केले असून वाई पोलिसांच्या कार्यपद्धती वर संशय व्यक्त केला आहे. या सर्व खासगी बसेस ना पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी वाईकर करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)