रुपयावरून निर्यातदारांची ओरड 

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची बेसुमार घसरण चालू आहे. गेल्या दहा महिन्यात रुपयाचे मूल्य तर 13 टक्‍क्‍यांनी कोसळले आहे. त्यामुळे निर्यातदार प्रचंड अडचणीत आले आहेत. यातून शक्‍य तितक्‍या लवकर मार्ग निघाला नाही तर अडचणीत वाढ होईल, असा इशारा निर्यातदारांची संघटना असलेल्या “फिओ’ने दिला आहे.
याबाबत बोलताना फिओचे अध्यक्ष गणेशकुमार गुप्ता यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे रुपया कोसळल्यामुळे निर्यातदारांना फायदा होतो. असे समजले जाते. मात्र दैनंदिन होणाऱ्या चढउतारामुळे आम्हाला कोणताही व्यवहार निश्‍चित करणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर परदेशात खरेदी करणारे आमच्याकडून मोठ्या प्रमाणात सुट मागत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक परिस्थितीकडे बारीक लक्ष आहे एवढेच सांगते. मात्र प्रत्यक्षात दिवसेंदिवस रुपयाचे मूल्य अस्थिर होत आहे. रुपया कोणत्याही पातळीवर असला तरी आमची काही हरकत नाही. मात्र, त्याचे मूल्य स्थिर असण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. निर्यातदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापेक्षा जास्त अडचणी आयातदारासमोर आहेत. यामुळे एकूणच भारताच्या व्यापारावर नकारात्मक परिणाम होत आहे. यातून शक्‍य तितक्‍या लवकर मार्ग काढावा, असे त्यांनी सांगितले.
व्यापारातील अस्थिरतेमुळे व्यापार मंदावला आहे. त्याचा परिणाम चालू खात्यावरील तूट वाढण्यात होत आहे. चालू खात्यावरील तूट वाढल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. दीर्घ पल्ल्यात भारताला आयातीपेक्षा निर्यात वाढवावी लागणार आहे. मात्र, रुपया अस्थिर असल्यामुळे कोणतेही व्यापारी व्यवहार होण्यात अडचणीत येत आहेत. यामुळे यातून सर्वसमावेशक मार्ग काढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला मोठ्या प्रमाणात डॉलर मोजून क्रुडची आयात करावी लागत असल्याचा रुपयावर परिणाम होत आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)