सातारा – पोवई नाका येथील एका स्टेशनरी दुकानात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटने इनर्व्हटरचा स्फोट झाल्याने आग लागून दोन तरुण जखमी झाले आहेत. कुणाल कदम (वय 20, रा. कदमबाग, सातारा) व जय दगडे (वय 20) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत दुकानातील सुमारे वीस लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या आगीने पोवई नाका परिसरात धुराचे लोट तयार झाले होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोवई नाक्यावरील श्री स्टेशनरी या दुकानाला गुरुवारी रात्री कुणाल कदम व जय दगडे हे दोघे रात्री अकराच्या सुमारास काम करत होते. यावेळी दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटने इनर्व्हटरचा स्फोट झाला. या स्फोटाने दुकानातील दोघेही दुकानाबाहेर फेकले गेले. स्फोटामुळे दुकानातील साहित्याने पेट घेतला होता. आगीमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत भाजलेल्या दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.