शिकेकाईची अवैध वाहतूक

साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाबळेश्‍वर येथील घटना तिघांवर गुन्हा दाखल

महाबळेश्‍वर – अवैधरित्या राखीव वनातून शिकेकाई गोळा करून वाहतूक करणाऱ्या टोळीस महाबळेश्‍वर वनखात्याने अत्यंत शिफातीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 45 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारात वन उत्पादनांची खरेदी विक्री करणारी मोठी टोळी असण्याची शक्‍यता वनविभागाकडून वर्तविली जात असून त्यादृष्टीने सहाय्यक वनसंरक्षक के. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्‍वरचे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड हे तपास करीत आहेत.

महाबळेश्‍वर वनक्षेत्राच्या हद्दीतील राखीव वनातून अवैधरित्या शिकेकाई व अन्य वन उत्पादने गोळा करून महाबळेश्‍वर येथील प्रतापगड घाटातून वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती महाबळेश्‍वर वनखात्यास मिळाली. वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी तातडीने त्यानुसार येथील महाड नाका येथे मंगळवारी, 12 रोजी रात्री 8.30 वाजता वनपाल एस. एम. शिंदे, वनरक्षक डी.बी. सोरट, ए. व्ही. पाटील, ए. डी. कुंभार, बी. टी. वडकर यांच्या मदतीने सापळा रचून नाकेबंदी केली असता तेथे वनखात्याला एमएच – 11-एजी 4076 या महिंद्र पिकअप वाहनामधून अवैधरित्या शिकेकाईची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर गाडीसह मुद्देमाल व संशयितांना ताब्यात घेवून तपास केला असता अक्षय कारंडे (वय 22), अमोल कारंडे (वय 27, दोघे रा. वाडा कुंभरोशी, प्रतापगड पायथा) व वाहन चालक जयंत आनंदा चव्हाण (वय 32, रा. पांडेवाडी ता. वाई) हे तिघे शिकेकाईची सुमारे 55 पोती घेवून वाई येथील व्यापाऱ्याला विकण्यास चालले असल्याचे उघडकीस आले. वनाधिकाऱ्यानी तातडीने या तिघांवर गुन्हा दाखल केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली महिंद्र पिकअप, ऍक्‍टीव्हा स्कूटी तसेच 55 पोती शिकेकाई असा एकूण सुमारे 3 लाख 45 हजाराचा मुद्दे माल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)