“आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने’

समाजामध्ये युवकांनी सकारात्मक योगदान देऊन सामाजिक परिवर्तनात पुढाकार घेण्यासाठी व त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी, युवकांना योग्य मार्ग व दिशा देण्यासाठी “आंतरराष्ट्रीय युवक दिन’ हा दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रामार्फत 2000 सालापासून हा दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी “सेफ स्पेसेस फॉर युथ’ ही या युवक दिनाची संकल्पना ठेवण्यात आली आहे. आज जे देश विकसित आहेत त्यांनी त्यांची प्रगती तेव्हा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तरूणामुळेच प्रगती शक्‍य झाली. परंतु आज त्यांच्याकडे असणारी तरुणांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र विकसनशील राष्ट्राकडे असणारी सकारात्मक बाब म्हणजे, आज जगाच्या सुमारे 85 % युवक विकसनशील राष्ट्रात आहेत. त्यात भारत हा अग्रेसर आहे. भारताची सुमारे 40 % लोकसंख्या ही युवकांची आहे. तरूणांची प्रचंड संख्या ही भारतासाठी लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ठरू शकते, परंतू हा लाभांश मिळवण्यासाठी गरज आहे ती तरुणांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, संसाधने यासारख्या आर्थिक, सामाजिक, राजकिय संधी उपलब्ध करून देणे.

-Ads-

आज युवकांमध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यातील महत्वाचा म्हणजे बेरोजगारी होय. खरे तर स्वातंत्र्यापासून भारताने बेरोजगारी आणि पर्यायाने गरिबी हटवण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत, परंतु तरीही पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्यात यश मिळाले नाही. बेरोजगारीमुळे आज अनेक तरुण गुन्हेगारी वृत्तीकडे आकर्षित होतांना दिसत आहेत. उदाहरणार्थ आयसिस सारख्या दहशतवादी संघटनेत तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे किंवा जम्मू-काश्‍मीर मध्ये दगडफेक, हिंसक आंदोलने यामध्ये तरुण सहभागी होताना दिसत आहे.

सद्यस्थिती बघता आजचा तरुण सोशल मीडियामध्ये जास्त प्रमाणात गुंतल्याचे दिसत आहे. अतिरेकी सोशल मीडियाच्या वापरामुळे, तो आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत तर आहेच. परंतु त्याचबरोबर स्वत:वर आणि पर्यायाने समाजावर अनेक संकटे ओढवून घेत आहे. उदाहरणार्थ सोशल मीडिया वर अफवा पसरवणे, व त्या अफवांवर विश्वास ठेवणे, त्यातून स्वत:ला, समाजाला घातक असलेले पावले उचलणे, तसेच लाईव्ह व्हिडीओ शेअरिंगच्या व सेल्फीच्या नादात आज अनेक तरुण जीवाला मुकताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे तरुण वर्ग कुटुंबापासून, मित्रापासून दूर जात आहे. त्याचीच पर्याप्तता नैराश्‍यात होऊन पुढे आत्महत्यासारखे मार्ग अवलंबताना दिसत आहे.

युवक हा देशाचा खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतो. त्याला युवा अवस्थेमध्येच विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पडाव्या लागत असतात. यातूनच युवा वर्ग हा घडत असतो. सामाजिक भान, स्वतः ची कर्तव्ये, कुटुंबाप्रती जबाबदारी यातूनच युवा वर्गाचे सामाजिकदृष्टया परिवर्तन होत असते. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तो समाजाचा एक महत्त्वाचा घटक ठरत असतो. यासाठी युवकांच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणे, युवा अवस्थेच्या उंबरठ्यावर असताना समाजाच्या निती-नियमांच्या चौकटीची ओळख करून देणे, त्यास अर्थाजनास उपयोगी पडेल असे प्रशिक्षण देणे, कायदयांची व्यवस्थित ओळख करून देणे अशा अनेक प्रकारे आपण राष्ट्रातील युवक घडविण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे.

आज स्वातंत्र्याची जवळपास पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असतानाही युवकाचे प्रश्न, युवकांच्या हक्कांपर्यंत सरकार आणि पर्यायाने समाज पोहचल्याचे दिसत नाही. युवकांचा प्रश्न सोडवत असताना बालके, शालेय विद्यार्थी यांचेही प्रश्न सोडवणे तितकेच महत्वाचे आहे. कारण बालपण जर सक्षम असेल, बालपणात जर योग्य संस्कार, योग्य सामाजिक नीती मूल्ये यांची पेरणी केलेली असेल तर तोच बालक, युवावस्थेमध्ये देशासाठी खऱ्या अर्थाने गुणात्मक संपत्तीचा भाग ठरू शकतो.

भारतासारख्या तरुणाच्या देशात मात्र अजूनही राजकिय क्षेत्रात तरुण वर्ग उतरताना दिसत नाही. त्यामुळे तरूणांसमोरील आवाहने, तरुणांचा कल हे सर्व ओळखण्यात राजकीय व्यासपीठ कमी पडत आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला जर विकसीत देशाकडे घोडदौड करायची असेल तर, तरुणांमधील असंतोष कमी करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक वेळेस ह्या युवकांकडे उत्तम कौशल्य असूनही मार्ग मिळत नसल्यामुळे अनेक युवक आज प्रवाहाच्या मागे फेकले गेले आहेत, त्यामुळे ते राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देण्यात कमी पडत आहेत. “स्किल इंडिया’ सारख्या योजना आखून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून कौशल्यपूर्ण, कल्पक, जबाबदार आणि समाजाला उत्तरदायित्व असे तरुण कसे निर्माण करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे युवकांसाठी योग्यरित्या कल्याणकारी योजना राबविल्यास व त्यांना देशविकासात सामावून घेतल्यास देशात सुप्रशासन व माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील तरुणांचा भारत नक्की घडेल. सर्वांना आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या शुभेच्छा…!

– अतुल मोरे

What is your reaction?
17 :thumbsup:
5 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
40 :cry:
44 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)