जागतिक महिला दिन विशेष : भारतीय महिला डॉक्‍टर्स

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीला वंदन करताना भारतातील महिला डॉक्‍टर्सना विसरून चालणार नाही. भारतातील स्त्रीवादी लढ्यावर, सामाजिक इतिहासावर आणि वैद्यकीय सेवेवर आपला ठसा उमटविणाऱ्या या देदीप्यमान स्त्रियांना विसरून चालणार नाही.

डॉ. कादंबनी गांगुली
लग्न करून कौटुंबिक गोष्टींमध्ये रमण्याऐवजी त्या गोष्टींचा त्याग करून उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या जिद्दीने झटून एल.आर.सी.पी., एल.आर.सी.एस. आणि जी.एफ.पी.एस. या पदव्या 1886मध्ये प्राप्त केल्या. भारतातील त्या दुसऱ्या महिला डॉक्‍टर ठरल्या.

डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती
भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ञ. 1949मध्ये तत्कालीन ब्रम्हदेशातील रंगून मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. आणि त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील एफ.आर.सी.पी. आणि एफ.आर.सी.पी.इ. या उच्च पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर काही वर्षी ब्रिटनमध्ये त्यांनी ‘कार्डीऑलॉजी’चा विशेष अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आले की हृदयरोगाबाबत भारतात फारशी सोय नाही. त्यामुळे भारतात परत येऊन त्यांनी भारतातील पहिले ‘हार्ट क्‍लिनिक’ आणि भारतीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिला हृदयरोगविकाराचा विभाग सुरू केला. नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट, दिल्ली तसेच ऑल इंडिया हार्ट फौंडेशनच्या त्या संस्थापक संचालक आहेत. 1992मध्ये त्यांना पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले गेले.

डॉ. इंदिरा हिंदुजा
मुंबईमध्ये भारतातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीला जन्म देणाऱ्या स्त्रीरोग तज्ञ. 1988मध्ये ‘गॅमीट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर’ (गिफ्ट) पध्दतीने त्यांनी कृत्रिम गर्भधारणा या विषयाला चालना दिली आणि वंध्यत्वाने त्रस्त असलेल्या लाखो स्त्रियांना एक नवी आशा दिली. 2011मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

डॉ. रुक्‍मिणी राऊत
स्वतंत्रपणे स्वतःची वैद्यकीय प्रॅक्‍टिस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्‍टर. 1864 साली जन्मलेल्या रुक्‍मिणीबाईंचा विवाह अल्पवयात झाला. माहेरच्या सुशिक्षित वातावरणात वाढलेल्या रुक्‍मिणीबाई सासरच्या अशिक्षित वातावरणात असमाधानी होत्या. वयाच्या 10व्या वर्षी झालेले लग्न मला मान्य नाही अशा विचारांनी त्या पतीपासून वेगळ्या झाल्या. त्यांच्या पतीने त्यांच्याविरुध्द केलेल्या खटल्यात कोर्टाने त्यांना, ‘एकतर नांदायला जा किंवा जेलची हवा खा’ अशा स्वरूपाचा निकाल दिला. परंतु न डगमगता त्यांनी त्याविरुध्द रमाबाई रानडे यांच्या सहकार्याने सामाजिक पातळीवर लढा दिला. 1891साली त्याची दाखल घेतली जाऊन मुलीच्या लग्नाचे वय 10 वर्षापासून 12 वर्षापर्यंत वाढवण्यात आले, आज ते 18 वर्षे केलेले आहे. पण त्याचा पाया रुक्‍मिणी राउत यांनी दिलेल्या लढ्यात रचला गेला. 1889 ते 1894 याकाळात ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन’मध्ये शिकून वैद्यकीय पदवी मिळवली. सुमारे 30 वर्षे विविध सरकारी आणि धर्मादाय इस्पितळात वैद्यकीय सेवा देऊन 1955साली त्या मुंबईत स्वर्गवासी झाल्या.

– डॉ. अविनाश भोंडवे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)