जागतिक महिला दिन विशेष : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

भारतातील बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहते. तिथल्या स्त्रियांना रोज अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. त्यातल्या निदान काही समस्या आपण विज्ञानाच्या मदतीने दूर करू शकतो या ठाम विश्‍वासाने डॉ प्रियदर्शिनी कर्वे विज्ञानक्षेत्रात काम करतात.

प्रियदर्शिनी या कृषिसंशोधन आणि समुचित तंत्रज्ञानात महत्वाचं कार्य करणार्या डॉ आनंद कर्वे यांच्या कन्या, आणि पुरातत्त्वशास्त्राच्या संशोधक डॉ इरावती कर्वे यांच्या नात. फिजिक्‍समध्ये पदवी मिळवल्यावर त्यांनी चुलीसाठी योग्य इंधन मिळवण्याच्या प्रकल्प हाती घेतला. कास्टफर्ड या पुण्याच्या संस्थेसाठी हा प्रकल्प करताना माती आणि लाकडाचा भुसा यांचं योग्य प्रमाणात मिश्रण करण्यात प्रियदर्शिनी यशस्वी झाल्या.

बायोमास इंधन, त्याच्या घटकांचे रासायनिक गुणधर्म, आणि चुलीसाठी योग्य ते भौतिक गुणधर्म म्हणजे आकार व घनता – याचा अभ्यास करता करता त्यांनी याच विषयात पुढे संशोधन करायचं ठरवलं. सौर उर्जेत पदव्युत्तर शिक्षण आणि रसायनशास्त्रात पीएचडी झाल्यावर त्या पुन्हा बायोमास इंधनाकडे वळल्या. दरम्यान डॉ आनंद कर्वे आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून आरती (ए्‌प्रोप्रिएट रूरल टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूट) संस्थेची स्थापना केली होती, आणि प्रियदर्शिनी आनंदाने वडिलांच्या कार्यात सहभागी झाल्या. ते वर्ष होतं 1998.

संशोधनाचा आपला वारसा पुढे चालवत प्रियदर्शिनी यांनी तिथे निर्धूर चुली, काडीकचऱ्यापासून इंधनं अशा विषयांवर काम केलं. ऊसाच्या पाचटापासून, म्हणजे तोडणी केल्यानंतरशेतात जो पाला शिल्लक रहातो,त्यापासून कोळसा करण्याच्या त्यांच्या प्रकल्पाला सरकारी मदत आणि मान्यता मिळाली. त्यातूनच पुढे काडीकचऱ्यापासून कांडीकोळसा करण्याचा प्रकल्प उभा राहिला. कांडीकोळसा व त्यावर चालणारा वाफेचा कुकर या जोडीचा त्यांनी प्रसार केला. दरम्यान त्यांनी लाकूड फाट्यावर चालणाऱ्या सुधारित चुली व इतर स्वयंपाक साधनं ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यावसायिकांचं जाळं कसं तयार करता येईल, या दृष्टीने बरंच विचारमंथन केलं होतं. ह्याची प्रत्यक्षात पडताळणी पहाण्यासाठी त्यांना शेल फाउंडेशनकडून मदत मिळाली. महाराष्ट्रभरात विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लाखभर घरांमध्ये या चुली पोहोचल्या आणि त्यासाठी शंभरेक व्यावसायिक उभे राहिले. या कार्यासाठी संस्थेला 2002 मध्ये लंडनचं सुप्रसिद्ध ऍशडेन अवॉर्ड फॉर रिन्यूएबल एनर्जी प्रदान करण्यात आलं.

आज प्रियदर्शिनी पुण्यातल्या आपल्या समुचित एन्व्हायरो टेक या संस्थेत ग्रामीण घरांमधील प्रदूषण कमी करण्यावरकाम करत आहेत. काडीकचऱ्याचा वापर करून इंधन आणि इतर उपयुक्त उत्पादनं बनवणं यावर त्यांचा भर आहे. सोबत शहरी नागरिकांना आणि उद्योगांना आपले दैनंदिन व्यवहार निसर्गपूरक कसे करता येतील, यासाठीही त्या मार्गदर्शन करतात.
शाश्‍वत विकासासाठी काम करताना योग्य तेच आणि तितकेच तंत्रज्ञान वापरावं याकडे त्यांचं लक्ष असतं. ग्रामीण भागात तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणारं, पर्यावरणपूरकतेबरोबरच लोकांची सोय करून देणारं असं तंत्रज्ञान हवं असा त्यांचा आग्रह असतो. पर्यावरणाच्या समस्यांचे मूळ शहरांमध्ये आहे, त्यामुळे तिथेही काम करायला हवे, ही त्यांची भूमिका आहे. सोबत त्या शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रकारे आपलं योगदान देत असतात.

आदिशक्ती अवॉर्ड, सह्याद्री हिरकणी अवॉर्ड, पर्यावरण गटातील वर्ल्ड टेक्‍नॉलजी अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी डॉ प्रियदर्शिनी कर्वे यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आज जागतिक महिला दिनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

– डॉ. मेघश्री दळवी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)