जागतिक महिला दिन विशेष : आनंदीबाई जोशी

आनंदीबाईंचे माहेरचे नाव यमुना गणपत जोशी असे होते. दोन मुलींच्या पाठीवर तिसरी मुलगी म्हणून ती 31मार्च 1865 रोजी जन्माला आली. यमू लहानपणापासून एकपाठी होती. जेमतेम नऊदहा वर्षाची असताना वडिलांनी तिचा विवाह गोपाळराव जोशी या पोस्टमास्तरशी ठरवला. लग्न होताच गोपाळरावांनी तिला शिकवण्यास सुरुवात केली. समाजाकडून त्यांना कडाडून विरोध झाला. पण त्यांनी तिचे शिक्षण चालूच ठेवले. डॉक्‍टर होण्यासाठी अमेरिकेस पाठवण्याचे ठरवले.

सव्वाशे वर्षांपूर्वी, सातासमुद्रापार, भारतातील एकट्या स्त्रीने अमेरिकेत जाणे सोपे नव्हते. अमेरिकेत गेल्यावर मात्र कार्पेन्टर दांपत्याकडून तिला भरभरून प्रेम, कौतुक मिळाले. त्या काळातील आनंदीला सात भाषा येत होत्या आणि इंग्रजी तर ती अगदी सफाईने बोलत असे. इतक्‍या लहान वयात आनंदीची ही प्रगती पाहून तिथली माणसे लाघवी स्वभावाच्या आनंदीला कौतुकाने “लिटल वुमन’ म्हणत. पेनसिल्व्हिनिया कॉलेजमध्ये डीन रिचेल बॉडले या तिच्या शिक्षिका होत्या. ज्ञानार्जनाच्या खडतर प्रवासात आनंदीला पावलोपावली अडचणी येत. पण तिने त्या साऱ्यांना धीरोदात्तपणे तोंड दिले.

त्या काळात भारतामधे स्त्री-डॉक्‍टरची नितांत गरज होती; पण स्त्रीला शिकवायचे नाही या हट्टापायी बायकामुले मृत्युमुखी पडत होती. बाळंतपणात स्त्रियांचे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप मोठे होते. म्हणून आनंदीने पेनसिल्व्हिनिया कॉलेजमध्ये प्रसूतीशास्त्र हाच विषय घेतला. अत्यंत प्रतिकूल हवामानातसुद्धा आनंदीबाईंनी भारतीय पोषाखात थोडाही बदल केला नाही. त्या तिथे वारंवार आजारी पडू लागल्या. गोपाळराव सुधारक होते, तितकेच विक्षिप्त होते. त्यांच्यामुळे आनंदीला मनस्ताप होत असे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर आनंदीबाईंनी डॉक्‍टर ऑफ मेडिसिन ही पदवी प्राप्त केली.

गुरुवार, 11 मार्च 1886 हा दिवस आनंदीबाईंच्या जीवनातील परमोच्च आनंदाचा व साफल्याचा होता. आशिया खंडातील एका पौर्वात्य विद्यार्थिनीने इतक्‍या लहान वयात, परदेशात एकटीने राहून डॉक्‍टर ऑफ मेडिसिन ही पदवी संपादन केली. अमेरिकेतील अकादमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात राष्ट्राध्यक्ष, प्रतिष्ठित डॉक्‍टर, नागरीक अशा तीन हजार लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. त्या वेळी पं.रमाबाई इंग्लंडला होत्या. आनंदीबाईंच्या या अभिमानास्पद पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी त्या खास इंग्लंडहून अमेरिकेत आल्या. त्या हिंदुस्थानात परत आल्या तेव्हा आजारीच होत्या. त्या इथे पोचताच उपस्थितांनी पुष्पवृष्टी केली. त्यांच्याविषयी सगळ्यांच्या आशाआकांक्षा पल्लवीत झाल्या. आनंदीबाईंनीही उभारी धरली. कोल्हापूरच्या संस्थानने अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये आनंदीबाईंची स्त्री डॉक्‍टर म्हणून नेमणूक करण्यासाठी त्यांना गौरवपूर्ण आमंत्रण दिले. पण शारीरिक हालअपेष्टा, मानसिक खच्चीकरण, प्रतिकूल हवामानात शिक्षण, बोटीचा प्रवास आणि यातून येणारा एकाकीपणा सहन करताना आनंदीबाईंची सहनशक्ती संपुष्टात आली होती. क्षयरोग शेवटच्या अवस्थेत पोचला होता. 26 फेब्रुवारी 1887 या दिवशी त्यांनी शेवटचे शब्द उच्चारले, “माझ्या हातून जेवढं झालं, तेवढं मी केलं!’

गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या शेवटच्या इच्छेनुसार कार्पेन्टर मावशींकडे आनंदीबाईंची रक्षा पोचवली. अमेरिकेतील पोकीस्पी या गावी त्यांची समाधी झाली. डॉ.आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या स्त्री डॉक्‍टरची ही कहाणी! अतिशय बुद्धिमान, जिद्दी आणि निरलस आनंदीबाईंना त्यांचे कर्तृत्व गाजवण्यासाठी अवघे आभाळ खुले झाले असताना, अवघ्या तेविसाव्या वर्षी त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला.

– माधुरी तळवलकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)