जानेवारी 2004 पासून अमेरिकेचे पाकिस्तानात एकूण 409 ड्रोन हल्ले

आत्ता पर्यंत एकूण 2714 ठार आणि 728 जण जखमी

इस्लामाबाद  – अमेरिकेने पाकिस्तानात गेल्या जानेवारी 2004 पासून आत्तापर्यंत एकूण 409 ड्रोन हल्ले केले त्यात एकूण 2714 जण ठार झाले असून 728 लोक जखमी झाले असल्याची माहिती पाकिस्तान सरकारकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बजौर, बन्नु, हंगु, खैबर, कुर्रम, मोहमंद, उत्तर वझिरीस्तान, नुशकी, ओकारझाई आणि दक्षिण वझिरीस्तान या भागात अमेरिकेकडून ड्रोन हल्ले झाले आहेत. तालिबानी गनिमांचे अड्डे उद्धवस्त करण्यासाठी अमेरिकेकडून हे हल्ले वेळोवेळी केले गेले पण त्यात अन्य नागरीकांचीही जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

हे ड्रोन हल्ले बंद करावेत अशी सुचना पाकिस्तान सरकारने अमेरिकेला वारंवार केली आहे पण पाकिस्तानच्या या सूचना अमेरिकेने जुमानल्या नाहींत. 2008 ते 2012 या काळात अमेरिकेने सर्वाधिक ड्रोन हल्ले तिकडे केले आहेत. त्यातही सन 2010 या एकाच वर्षात एकूण 117 हल्ले झाले त्यात 775 लोक ठार झाले.

यंदाच्या वर्षात आत्तापर्यंत केवळ दोन ड्रोन हल्ले करण्यात आले त्यात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. अलिकडच्या काळात अमेरिकेने हे हल्ले कमी केले असले तरी तशा प्रकारच्या हल्ल्यांची टांगती तलवार अजून कायम आहे कारण हे हल्ले पुर्णपणे बंद करण्यात आल्याचे अमेरिकेने अजूनपर्यंत तरी जाहीर केलेले नाही.

पाकिस्तानातील तालिबानचा प्रमुख मुल्ला अख्तर मन्सुर याच्यासह तालिबानची अन्य नेतृत्वाची फळीही या हल्ल्यांमध्ये गारद झाल्याने अमेरिकेच्या या ड्रोन हल्ल्यांना मोठेच यश मिळाले आहे. या हल्ल्यांद्वारे अमेरिकेने उत्तर वझिरीस्तान प्रांतातील तालिबानचे बहुतेक सर्व अड्डे उद्धवस्त केले आहेत. त्यामुळे तालिबानी गनिमांची तेथून पळापळ झाली. त्यांनी आता अन्यत्र आश्रय घेऊन आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)