राम मंदिरावरून भाजपामध्ये कलह 

खासदार साक्षी महाराज यांनी दिला पक्ष सोडण्याचा इशारा 
उन्नाव: लोकसभा निवडणूका येताच पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्‌दा जोर धरू लागला आहे. राम मंदिर बांधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने मोदी सरकारला 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. यामध्ये आता आणखी भर पडली असून राम मंदिरावरून भाजपामध्ये अंतर्गत कलहाला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी भाजपाला राम मंदिर बांधा, अन्यथा पक्षाला सोडचिठ्‌ठी देईन, असा इशारा दिली आहे.
साक्षी महाराज म्हणाले, केंद्र सरकारमध्ये भगवान राम यांच्या आशीर्वादामुळेच भाजपला सत्ता मिळालेली आहे. राम मंदिर उभारण्यासाठी दिर्घ काळापासून आंदोलनाही केली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर राम मंदिर बांधले नाही तर भाजपाच्या सदस्यतेचा राजीनामा देणार, असे साक्षी महाराज यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्यावरून सरकारला इशारा दिला होता. सरकारने त्याचा सन्मान करायला हवा. राम मंदिर हा भारतातील लाखो लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेत याबाबतचा कायदा मंजूर करून घ्यावा. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राम मंदिर बांधावे, असेही साक्षी महाराज म्हणाले.
दरम्यान, राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने मोदी सरकारला 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली असून, तोपर्यंत संसदेत कायदा झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत विश्व हिंदू परिषदेने दिले. विहिंप’ने उच्चाधिकार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतून मोदी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही कायदा मंजूर करून घेता येऊ शकतो. त्यामुळे 2018च्या अखेपर्यंत राम मंदिर उभारणीतील सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकेल. तसे नाही झाले तर धर्मसंसदेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल, असे विहिंप’चे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)