आंतरजातीय प्रेमविवाह अमान्य; लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माहेरच्यांनी मुलींला नेले पळवून

पुणे – देश स्वातंत्र्य होऊन 72 वर्षे उलटून गेली. तरीही अद्याप समाजातील जातीयता संपलेली नाही. पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील ही स्थिती आहे. महाविद्यालयात शिकताना प्रेम झाल्याने मागासवर्गीय मुलाने उच्च जातीतील मुलीशी लग्न केले. मात्र, मुलीच्या घरच्यांना ते मान्य नाही. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर तिच्या घरच्यांनी तिला पळविले. मग सुरू झाला तिचा शोध. तिचे घरचे तिला संपवतील, या भीतीने त्याने पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली.

मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने मुलाने जिल्हा न्यायालयाचे दार ठोठावले. जिल्हा न्यायालयाने मुलीच्या शोधाचे आदेश पोलिसांना दिले होते. पोलिसांना ती सापडली नाही. मग त्याने तिला घरच्या लोकांच्या तावडीतून पळवून आणले. न्यायालयात शोधाचा अर्ज केल्यामुळे ते दोघे स्वत: हजर झाले. मात्र, भविष्यात दोघांचा जीव धोक्‍यात येऊ नये याकरिता ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या “सैराट’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील जातीयतेवर प्रखर टीका करण्यात आली होती. अद्यापही त्या परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे एका घटनेवरून दिसून आले आहे. माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्यांची नावे आहेत. दोघे एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतात. दोघेही कायद्याने सज्ञान आहेत. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मुलगी सवर्ण जातीतील असून मुलगा दलित समाजाचा आहे. त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. त्यांनी मुलीला घरात बंदिस्त केले. यानंतर मुलाने अनेक प्रयत्न करून मुलीला सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. स्थानिक पोलीस प्रशासनाने त्याच्या तक्रारीची कुठलीच दखल घेतली नाही. मुलीला संपर्क केल्या असता तिच्या घरच्यांनी ती बाहेरगावी गेली असे खोटेच सांगितले.

मुलीने धाडसाने आपली सुटका करून घेतली. दरम्यान, मुलाने ऍड. दीपक शामगिरे आणि ऍड. सौरभ तडवी यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने पोलिसांना सर्च वॉरंट बजावले. काहीही झाले तरी आपले प्रेम मुलीच्या घरच्यांना मान्य होणार नाही. त्यांचा विरोध होईल यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केले. मुलीच्या आई-वडिलांना ही गोष्ट कळाल्याने त्यांनी त्या दोघांना संपविण्याची धमकी दिली. सध्या ते दोघेही घाबरलेल्या अवस्थेत असून जीव वाचावा याकरिता न्यायालय आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून मदतीच्या अपेक्षा करीत आहेत.

आजच्या आधुनिक काळातही समाजात जातीयता टिकून आहे. यामध्ये तरुणाई भरडली जाताना दिसते. प्रेमात जात आणून जातीच्या नावाखाली दोघांना संपविण्याची भाषा करणे कितपत योग्य आहे? या घटनेत मुलाला पोलिसांकडून कुठलीही मदत मिळाली नाही. मुलीचे वडील प्रतिष्ठीत असल्याने त्यांनी दबाव आणल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भविष्यात त्या दोघांचा संसार आनंदाने पार पडावा, त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
– ऍड. दीपक शामगिरे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)