हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण (भाग १)

अवर्षण परिस्थिती व ऊसाला पाण्याचा पडलेला ताण या प्रमुख कारणांमुळे ऊस या पिकावर हुमणी या किडीचा प्रादुर्भाव वाढतांना दिसून येत आहे. हुमणीचा प्रादुर्भाव नदीकाठच्या जमिनी, हलक्‍या जमिनी, मुरमाड जमिनी तसेच सखल भागामध्येसुध्दा आढळून येतो आहे. हुमणी ही बहुभक्षीय किड असून ऊस, भुईमुग, हरभरा, कांदा, टोमॅटो, सुर्यफुल, मुग, तूर, सोयाबीन, चवळी, मिरची, बटाटा, आले या पिकांवर तसेच तृणधान्ये, कडधान्य, भीापाला व तेलवर्गीय या पिकांवरसुध्दा हुमणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीला राष्ट्रिय किड म्हणून संबोधले जात असून भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पजांब, हरियाण व आसाम या राज्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे 30 ते 80 टक्‍यांपर्यंत पिकाचे नुकसान होते. 

सन 1909 साली भारतात बिहारमध्ये या किडीचा प्रथम प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. भारतामध्ये हुमणीच्या सर्वसाधारणपणे 300 प्रजाती असून त्यामधील लिकोफोलीस लिपीडोफोरा (नदी काठावरील) आणि होलोट्रकिया सेरेटा (माळावरील) या दोन प्रजाती महाराष्ट्रामध्ये आढळतात. यात मागील 3 ते 4 वर्षांमध्ये फायलोग्यथस व ऍडोरेटस या प्रजातींचीसुध्दा भर पडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये होलोट्रीकिया सेरेटा या प्रजातीमुळे मोठया प्रमाणात नुकसान होत असून ही जात हलक्‍या जमिनीत आणि कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उगवणीमध्ये 40 टक्‍यांपर्यंत, तर उत्पादनांमध्ये 15 ते 20 टनांपर्यत नुकसान होते.

हुमणीचा जीवनक्रम : 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंडी : या किडीचे मादी भुंगेरे साबुदाण्याच्या आकाराची एक-एक अशी सुटी 50 ते 60 पांढरी गोल अंडी 12 ते 15 सेंमी. खोलीवर जमिनीत घालतात. पावसाळा सुरु होताच जून-जुलै या महिन्यात ही कीड अंडी घालते आणि अंडयातून 9 ते 24 दिवसात अळी बाहेर पडते. अळी : अंडयातून बाहेर पडलेली अळी पांढरट रंगाची असून ती सेंद्रिय पदार्थ व मातीवर जगते. नंतर ती मुळांवर उपजिावीका करते. अळीच्या तीन अवस्था असून पहिली अवस्था 25 ते 30 दिवसाची, द्वितीय अवस्था 30 ते 45 दिवसांची व तृतीय अवस्था 140 ते 145 दिवसांची असते. अळीचा एकूण कालावधी 150 ते 210 दिवसांचा असतो. पुर्ण वाढ झालेली अळी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 15 ते 30 सेंमी. खोलीवर मातीत जाऊन स्वत:भोवती मातीचे घर (कवच) तयार करते. कोष : कोषाचा रंग तांबूस तपकिरी असून तो टणक असतो. ऑगस्ट ते मार्च या कालावधी अळी स्वत:भोवती कोष तयार करत असून कोषाचा कालावधी साधारणपणे 20 ते 40 दिवसांचा असतो. भुंगेरे : कोषातून बाहेर आलेले भुंगेरे पाऊस पडेपर्यंत (4 ते 5 महिने) काही न खाता जमिनीतच मातीच्या घरात पडून राहतात.

नोहेंबर महिन्यात तयार झालेले भुंगेरे हे मे-जूनच्या पहिल्या पावसापर्यंत सुप्तावस्थेत राहतात. याला भुंग्यांची सुप्तावस्था (क्विझंड स्टेज) म्हणतात. भुंगेऱ्यांचा रंग विटकरी ते काळपट असतो. पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामध्ये संध्याकाळी 7.20 ते 7.50 वाजता व जास्तीत जास्त रात्री 9.0 वाजेपर्यत सर्व भुंगेरे 10 ते 15 मिनीटात जमिनी बाहेर पडतात. मादी भुंगेरे साधारणपणे 93 ते 109 दिवस जगतात, तर नर भुंगेरे मिलनानंतर लगेच मरतात. भुंगेरे हे निशाचर असल्यामुळे सुर्योदयापुर्वी 5.45 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत जमिनीत जातात.

यजमान वनस्पती : हुमणी ही बहुभक्षीय किड असून प्रामुख्याने कडूनिंब व बाभळीच्या पानांवर जगते. या व्यतिरिक्‍त बोर, पिंपळ, गुलमोहोर, शेवगा, पळस, चिंच अशा 56 वनस्पतींवर ही कीड जगू शकते. या कीडीची अळी साधारणपणे ऊस, भुईमुग, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, आले, तृणधान्ये, कडधान्य, भाजीपाला, तेलबिया व फळवर्गीय अशा अनेक पिकांच्या मुळांवर उपजिविका करुन जगते.

आर्थिक नुकसान संकेत पातळी : प्रती घनमीटर अंतरावर एक हुमणीची अळी आढळून आल्यास तसेच हुमणीग्रस्त शेतामध्ये पावसाळयात कडूनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळून आल्यास या किडीच्या नियंत्रणाचे उपाय योजावेत.

नुकसानीचा प्रकार : अंडयातून बाहेर पडलेल्या प्रथम अवस्थेतील अळया झाडांची तंतूमुळे खाण्यास सुरुवात करतात. तंतूमुळे खाल्यानंतर ते मुख्य मुळे खाण्यास सुरुवात करतात. हुमणीचा प्रादुर्भाव झालेल्या ऊसाला हलकसा जरी झटका दिला तरी ऊस सहजासहजी उपटून येतो. अंडयातून बाहेर पडलेल्या प्रथम अवस्थेतील अळया जमिनीतील कुजलेले शेंद्रिय पदार्थ किंवा जीवंत मुळांवर उपजिवीका करतात. ऊसाच्या शेतात हेक्‍टरी 25 ते 50 हजार अळया आढळल्यास उत्पन्नात साधारणपणे 15 ते 20 टनांपर्यंत घट येते. ऊसाच्या एका बेटाखाली कमाल 20 पर्यंत अळया आढळून येतात. मात्र एका बेटाखाली एक किंवा दोन अळया जरी असल्या तरी त्या अळया एक महिन्यात ऊसाच्या मुळया कुरतडून कोरडया करतात. तसेच या अळया जमिनीखाली असलेल्या ऊसाच्या कांडयांचे देखील नुकसान करतात.

प्रादुर्भावाची लक्षणे : हुमणीच्या अळीने पिकाची मुळे खाल्यामुळे पिकाचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडते. प्रादुवर्भावग्रस्त ऊस निस्तेज दिसतो, पाने मरगळतात. पाने हळूहळू पिवळी पडून साधारणपणे 20 दिवसात ऊस पुर्णपणे वाळनूा काठीप्रमाणे दिसतो. एका झाडाची मुळे खाल्यानंतर अळी दुस-या झाडाकडे वळते, यामुळे शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.

एकात्मिक हुमणी व्यवस्थापन : हुमणी या किडीच्या नियंत्रणासाठी एकाच वेळीस सामुदायिक मोहिम राबवून एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब केल्यास निष्कर्ष चांगले व त्वरीत मिळतात.

प्रा. चांगदेव वायळ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)