प्रेरणादायी ‘संतोष’

शब्दांकन – रवी कुचेकर, भुईंज

देशाची लोकसंख्या सव्वाशे करोड झालेली असताना या देशामध्ये भेडसावणारा अतिशय महत्वाचा प्रश्‍न आहे तो म्हणजे बेरोजगारी. रोजगार निर्मिती करणारी अनेक नररत्ने भारतामध्ये निर्माण झाली.पण त्यांचा उपयोग फक्त शहरातील युवकांना होऊ लागला. खेडेगावांमध्येसुद्धा अनेक उमद्या तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्या व्यवसायाचे रूपांतर मोठमोठ्या उद्योग समूहामध्ये केले आहे. वाई तालुक्‍यातील जांब गावातील संतोषशेठ शिंदे यांनीसुद्धा आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून एका छोट्याश्‍या व्यवसायाचे रूपांतर मोठ्या उद्योग समूहामध्ये केले आहे. छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेल्या “हॉटेल संतोष’चे रूपांतर चार मोठमोठ्या शाखेमध्ये करून संतोष यांनी अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. आपल्या कामगारांच्या भविष्याचा रात्रंदिवस विचार करणारे बेरोजगार तरुणांचे पोशिंदे संतोष शिंदे यांच्या संघर्षमय वाटचालीचा घेतलेला हा आढावा…

चिलाई देवी, भैरवनाथ या ग्रामदेवतांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेल्या जांब या वाई तालुक्‍यातील छोट्याशा खेडेगावात 8 ऑगस्ट 1974 रोजी विलास आणि लीलावती या शिंदे दाम्पत्याच्या घरी एक गोंडस बालक जन्माला आले आणि शिंदे कुटुंबात आनंदी आनंद झाला.

परीस्थिती बेताची असल्याने शिंदे कुटुंबात जन्माला आलेल्या बालकाचा आनंद हा शिंदे कुटुंबापुरताच मर्यादित राहिला परिस्तिथी अत्यंत गरिबीची असल्याने ना पेढे वाटता आले ना मोठे नामकरण करता आले. बाळाचे नाव संतोष ठेवण्यात आले. बाळाकडे पाहून आई लीलावती विलासरावांना कायम म्हणत माझा सांतोष मोठा झाल्यावर तुमचं नाव खुप मोठं करेल. अस म्हणताच विलासराव पत्नी लीलावती यांना हो म्हणून गालातल्या गालात हसत, बघता बघता हे बालक बोलू लागलं चालू लागलं शाळेत जाऊ लागलं वडील विलास शिंदे हे कारखान्याच्या कॉलनीचे बांधकाम चालू होते तेथील ठेकेदार भरतभाई यांच्याकडे मुकादम म्हणून काम करत होते. त्या कामावरील प्रामाणिकपणा पाहून भरतभाई यांनी विलासरावांना कामासाठी मुंबईला नेले मुंबईत 8 ते 10 वर्ष भरतभाई यांच्याकडे मुकादम म्हणून काम केल्यानंतर तुटपुंज्या पगारात परवडत नसल्याने पुन्हा आपल्या जांब या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला जांब येथे परत आल्यानंतर कुटुंबाच्या उपजीविकेसाठी राहुल प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे छोटेसे किराणा मालाचे दुकान सुरु केले तसेच जांबच्या चावडीजवळ हॉटेल संतोष भुवन नावाचे छोटेसे हॉटेल सुरु केले. ज्या वयात खेळायच असत बागडायच असत त्या वयात म्हणजे वयाच्या 9 व्या 10 वर्षीच संतोष हॉटेलचे व्यवहार पाहू लागले, छोट्याशा असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानातील माल आणण्यासाठी संतोष प्रति तास 1 रु. भाड्याची सायकल घेऊन जांबपासून 6 किलोमीटर असणाऱ्या भुईंज गावात माल ने आण करत. संतोष यांचा हा सायकलवर पायपीट करून माल ने आण करण्याचा नित्यक्रम गावातील अबालवृद्ध कुतूहलाने पाहून संतोष यांना एवढ्या लहान वयात कामाची असलेली आवड पाहून कायम कौतुक करत. संतोष यांच्या आई लीलावती कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मामाकडून मटकी आणून ती पाचवडच्या बाजारावर विकत असत व आपल्या कुटुंबाला हाथभार लावत.

संतोष हे लहानपणापासूनच कुटुंबाची परिस्थिती गरिबीची असल्याने आईकडे कधीही कपड्यासाठी हट्ट धरत नसत. ज्या वयात नवीन नवीन कपडे घालायला मिळाले पाहिजे. त्या वयात संतोष एकाच शर्ट पॅण्ट जोडीवर पूर्ण वर्ष काढत असे. आई लीलावती मायेने संतोष यांच्या पाठीवर हात फिरवून म्हणत माझा संतोष लय काम करतो, त्याला जत्रेला चांगली कापड घ्यायची, पण संतोष कधीच आईकडे भारीतल्या कपड्यासाठी हट्ट धरत नसत. उलट मिळल त्या कपड्यात समाधान माणून यात्रा आनंदाने साजरी करत. बघता बघता संतोष 10 वी पास झालह. परंतु परस्थिती गरीब असल्याने संतोष यांनी आपले पुढील शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला, परंतु काही दिवसातच संतोष यांनी गावातील चावडीजवळील हॉटेल बंद करून भुईंज शिवथर मार्गालगत 1992-93 साली संतोष भुवन नावाने प्रशस्त हॉटेल चालू केले. त्यामुळे 10 ते 15 तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. आर्थिक उन्नती होऊ लागली, अशातच संतोष यांचा व्यवसायात चांगला जम बसलेला पाहून वनिता यांच्याशी संतोष हे विवाहबद्ध झाले. लग्नाच्या काही वर्षातच संतोष यांच्या संसारात दोन आपत्यांच आगमन झाल. एकीकडे सुखात चाललेला संसार दुसरीकडे हॉटेल व्यवसायातील गरुड भरारी या दोन्ही गोष्टी व्यवस्थित चालू असताना, शिंदे घराण्यात एक दुःखद घटना घडली ती म्हणजे संतोष यांच्या मोठ्या मुलाचे एका दुर्धर आजाराने निधन झाले, तरीही खचून न आपला व्यवसाय आहे. त्या जोशात चालूच ठेवला हा धक्का पचवतोय ना पचवतोय तोच अवघ्या तीन ते चार वर्षाच्या फरकाने दुसऱ्या लहान मुलाचे निधन झाले. त्यावेळी संतोष यांच्या यशस्वी वाटचालीवर जळणाऱ्या विकृत लोकांनी आसुरी आनंद साजरा केला व हा संतोष आता संपणार आता हा दारूच्या आहारी जाणार अशा वावड्या उठवायला सुरुवात केली, तसेच व्यवसायात खच्ची करण्यासाठी भरपूर अडचणी हेतुपुरस्पर निर्माण केल्या.

परंतु गावातील कै. हणमंत कृष्णा शिंदे, प्रमोददादा शिंदे, प्रकाशआबा शिंदे, प्रताप नारायण शिंदे, सुशील कुमार हरिभाऊ शिंदे, या जेष्ठ लोकांनी अडचणीच्या काळात संतोष यांना बहुमूल्य सहकार्य केले व मानसिक आधार दिला. तसेच व्यवसायातील आलेल्या संकट काळात पत्नी वनिता यासुद्धा ठामपणे संतोष यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.

यापुढे व्यवसायातील कर्मचारी हेच आपले कुटुंब मानायचे आणि त्यांच्या कुटुंबासाठी विविध प्रकारची मदत करण्याचा चंग संतोष यांनी मनाशी बांधला. त्यानुसार कामगारांचे विमा उतरवले, वैद्यकीय तपासण्या केल्या, कामगारांना स्वच्छतेच महत्व सांगून कामगार स्वछ टापटीपीत राहण्यास भाग पाडले तसेच चिलाईदेवी, भैरवनाथ मंदिर व श्री कृष्ण मंदिर व शेकडो विद्यार्थी ज्या जांब शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेच्या शाळा बांधकामासाठी भरघोस प्रमाणात आर्थिक मदत केली.

लहानपणापासून राष्ट्रीय महामार्गालगत एक तरी हॉटेल असावे असे स्वप्न संतोष यांनी बालपणापासून उराशी बाळगले होते, ते स्वप्न 2013 साली सत्यात उतरले. कृष्णा नदीच्या पुलानजीक असणारे शेरे पंजाब हे हॉटेल 16 वर्ष करारावर चालवण्यास घेऊन, राज इंटरनॅशनल नावाचे हॉटेल चालू केले.तेच हॉटेल आज साईसिद्धी नावाने चालू आहे, आपल्या हॉटेल निर्मितीमुळे बऱ्याचशा बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होत असल्याने अजून काही बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या आदर्श सदभावनेने कवठे येथे हायवेलगत राज नावाचे हॉटेल सुरु केले. तेथे 15 ते 20 तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. जे कर्मचारी कित्येक वर्षांपासून व्यवसायिक कुटुंबातील सदस्य आहेत त्या गरीब कामगारांच्या मुलींच्या लग्नात हॉटेल व्यसायातून झालेल्या आर्थिक नफ्यातून भरघोस प्रमाणात आर्थिक मदत केली, काही जवळचे गरीब मित्र होते. त्यांच्या मुलीच्या लग्नात कोणताही हिशोब न ठेवता सढळ हाताने संतोष यांनी अर्थिक मदत केली. भविष्यात लहान अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम बांधण्याचं स्वप्न संतोष शेठ यांनी उराशी बाळगले आहे.

जर नाममात्र शिक्षण घेतलेले संतोष शिंदे हे एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमधील हॉटेलचे रूपांतर अनेक हॉटेलमध्ये करत असतील आणि विविध तालुक्‍यामध्ये आपल्या हॉटेलिंग व्यवसायाच्या अनेक शाखा काढत असतील, तर मात्र वाई तालुक्‍यातील सुशिक्षित तरुणांनी सुद्धा, संतोष शिंदे यांचा आदर्श घेऊन स्वकर्तृत्वातून आपल्या विविध व्यवसायांची दालने उघडली तर, मोठमोठ्या उद्योग धंद्याना पोरका असलेला वाई तालुकासुद्धा प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जाईल व येथील युवकांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठमोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या अनेक व्यवसायानी आणि परोपकारी वृत्तीने सध्याच्या तरुणांचे आयडॉल बनू लागलेल्या राजा मनाच्या बेरोजगारांच्या पोशिंदा संतोषशेठ शिंदे यांना मानाचा सलाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)