आत्मविश्‍वास जागवणारी कारवाई ! (अग्रलेख)

भारतीय हवाईदलाने असंख्य भारतीयांच्या मनात असलेली इच्छा आज पूर्ण केली आणि पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील जैश-ए-मोहमद, हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या छावण्या उद्‌ध्वस्त केल्या. मध्यरात्रीनंतर त्या छावण्यांमधील दहशतवादी झोपेत असतानाच त्यांच्यावर ही झडप घातली गेली. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिक मनातून अस्वस्थ होता. त्याच्या मनात केवळ बदल्याची भावना होती. या अस्वस्थ मनांमध्ये आजच्या हल्ल्याच्या वृत्ताने समाधानाची भावना निर्माण झाली आहे. देशभर सैन्याचा जयजयकार सुरू आहे. भारतीय हवाईदलाच्या सैनिकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि अर्थातच सैन्याला पूर्ण मोकळीक दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही गुणगान सुरू आहे.

सोशल मीडियावर नागरिकांच्या कल्पनाशक्‍तीला बहर आला आहे. पाकिस्तानची आणि त्यांनी पोसलेल्या जिहादींची यथेच्छ नालस्ती सुरू आहे. नागरिक रस्त्यावर उतरवून तिरंगा ध्वज नाचवत जल्लोष करीत आहेत. एकमेकांना पेढे भरवले जात आहेत. असे सगळे उत्सवी वातावरण उभ्या भारतवर्षात बऱ्याच कालावधीनंतर पाहायला मिळाले आहे. हा राष्ट्रप्रेमाचा जल्लोष आहे. आणि तो पूर्ण समर्थनीय आहे. भारत अचानक इतका आक्रमक होईल अशी अपेक्षा कोणी फारशी जमेला धरली नव्हती. हवाईदलाच्या या कारवाई मागे राजकीय इच्छाशक्‍तीही महत्त्वाची आहे. त्याबद्दल केंद्रातील सरकारलाही याचे श्रेय द्यायलाच हवे. पुलवामात 40 जवान शहीद झाल्यानंतरही सरकार केवळ मूग गिळून गप्प बसले असते तर त्याची मोठी किंमत सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली असती. या हल्ल्यानंतर भारत सरकारने राजनैतिक पातळीवर काही हालचाली केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारी पातळीवरही पाकिस्तानला असलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यासारखे उपाय केले गेले, पण तेवढ्याने भागणारे नव्हते. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहायची हाच प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात होता. या कारवाईने तो अपेक्षित परिणाम साधला गेला आहे. 21 मिनिटांच्या कारवाईत पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरच नव्हे तर खुद्द पाकिस्तानी हद्दीतल्याही एका ठिकाणावर हल्ला केला गेला. मिराज विमाने त्यासाठी उपयोगी पडली. या हल्ल्याविषयी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून विस्तृत निवेदन जारी केले गेले. त्यात हा हल्ला लष्करी स्वरूपाचा नव्हता असे प्रकर्षाने स्पष्ट करण्यात आले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या सरकारी यंत्रणेचे, सार्वजनिक मालमत्तेचे किंवा नागरी वस्त्यांचे काहीही नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली गेली होती असे भारताने स्पष्ट केले आहे. जिहादी गट भारतावर पुन्हा अशा प्रकारचे हल्ले करण्याची शक्‍यता असल्याने त्यांचे हे मनसुबे उधळून लावणे आणि त्यांनी उभारलेली यंत्रणा नष्ट करणे एवढ्या मर्यादित हेतूनेच हे हल्ले केले गेले असे निवेदन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून केले गेले. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानला प्रत्युत्तरात्मक कृती करण्याला प्रोत्साहन मिळू नये याची काळजी भारताने घेतली आहे. तुमच्या भूमीत कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांवर प्रभावी कारवाई करण्यात तुम्हाला यश येत नसेल किंवा तुमच्याकडे तशी इच्छाशक्‍ती नसेल तर ते काम यापुढे आम्हालाच करावे लागेल हा भारताचा संदेश होता. यात पाकिस्तानला लष्करी आव्हान देणे हा हेतू नव्हता हे भारताने स्पष्ट केले ते बरे झाले. या संदेशाचा योग्य तो अन्वयार्थ पाकिस्तानचे राज्यकर्ते लावतील अशी अपेक्षा आहे.

केवळ युद्धखोरीच्या प्रवृत्तीतून ही कारवाई झालेली नाही हा संदेश पाकिस्तानने नीट समजून घेण्यातच त्यांचे हित आहे. अन्यथा प्रत्यक्ष लष्करी संघर्षातून दोन्ही देशांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. दोन्ही बाजुूची मोठी जीवितहानी तर होईलच पण त्यातून जे आर्थिक नुकसान होईल त्यातून पाकिस्तानचेच कंबरडे मोडले जाणार आहे. कारण आजच त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत तोळामासा आहे. त्यांना हा युद्धाचा भार पेलणे अजिबात शक्‍य नाही. त्यामुळे भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानकडून आक्रस्ताळेपणा होणार नाही अशी अपेक्षा आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर या हल्ल्याचा मोदींना राजकीय लाभ किती होईल हा एक कळीचा मुद्दा आहे. पाकिस्तानला धडा शिकवला ही कोणत्याही सरकारसाठी मोठीच जमेची बाजू असते त्यामुळे ते याचा राजकीय लाभ निश्‍चीत उठवणार यात शंका नाही. या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर आजचे जनमत सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच जाईल असा ढोबळ अंदाज कोणालाही बांधता येईल. देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेमाचा उन्माद निर्माण करून त्या आधारावर निवडणूक जिंकण्याचा हातखंडा सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे. पण हे जरी खरे असले तरी सगळ्यातच राजकारण आणून चालत नाही. पाकिस्तानला केव्हा तरी तडाखेबाज उत्तर देणे ही काळाचीच गरज होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने ती संधी साधली.

एवढेच आजच्या घडीला आपण म्हणू शकतो. भारताने पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईला विरोधकांकडूनही कमी लेखले जाण्याची शक्‍यता नाही. किंबहुना राहुल गांधी यांच्या सारख्या नेत्यांनी या कारवाईचे समर्थनच केले असून त्यांनीही भारतीय हवाईदलाच्या कामगिरीला सलाम केला आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणाला यात वाव देणे योग्य ठरणार नाही. आजचा हा हल्ला देशवासियांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करणारा ठरला आहे. आपण एक जिवंत राष्ट्र आहोत, आपणही शस्त्र उगारू शकतो, आणि आत्मसन्मानासाठी ताबारेषा ओलांडू शकतो हा आत्मविश्‍वास यामुळे जागवला गेला आहे हे नक्की. या महापराक्रमी कारवाईबद्दल भारतीय लष्कराचे पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन.

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला जगातील सर्वच देश ह्या दहशदवादामुळे मेटकळीला आलेले आहेत त्यातच खाद्य पाकिस्तान देश सुद्धा मरणप्राय दशा भोगत आहे असे असताना ह्या दशेतून पाकिस्त्यांला बाहेर पाडण्यासाठी भारताने वरील कारवाई करून अप्रत्यक्षा पणे पाकिस्तानला मदतीचा हात दिला आहे ह्याचे जगातील समस्त देशानी मान्य करावयास नको का ? त्यासाठी ह्या देशानी पाकिस्तानला मदत करण्याच्या हेतूने जशी भारताने कारवाई केली तशी कारवाई ह्या देशानीपाकिस्तान ह्या देशात सैन्य पाठवून प्रत्यक्ष कारवाई केल्यास पाकिस्तन ह्या मरणप्राय अवस्थेतून कायमचा मुक्त होईल असे वाटते . अशी अपेक्षा पाकिस्तानातील सामान्य जनता सुद्धा करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी तेथील जनतेने जाहीरपणे पाकिस्तानातील दहशदवादानाचे जे अड्डे आहेत त्याची संपूर्ण माहिती जगजाहीर करणे हि काळाची गरज ठरत नाही का ? कारण पाकिस्तानातील सामान्य जनता सुद्धा शांतताप्रिय आहे कारण मागच्या श्री आणा हजारेंच्या उपशवनावेळी काही पाकिस्तानी सज्जन नागरिक अन्नाची प्रत्यक्ष भेट घेण्यास भारतात आल्याचे वृत्त वाचण्यात आले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)