#प्रेरणा: तहानलेल्यांची “पाणीदार’ आई 

दत्तात्रय आंबुलकर 
मुंबईत राहणाऱ्या 60 वर्षी अमला रुईया यांनी आपल्या अथक भगीरथ प्रयत्नांनी राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. अमला रुईया यांनी प्रयत्नपूर्व पारंपरिक जलसंचयनाचा तांत्रिक पद्धतीने उपयोग करून त्यासाठी 200 जलकुंभ बनविले. या जलकुंभांमध्ये आज 1 कोटी लिटर पाणी जमा होते. याशिवाय त्यांनी राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागात 200 पेक्षा जास्त ठिकाणी चेकडॅम लघु बंधारे तयार केले. त्यामुुळे आसपासच्या सगळ्या विहिरी पाण्याने पुरेशाप्रमाणात भरल्या आहेत.
अमला रुईया या मुंबईत स्थायिक झाल्या असल्या तरी त्यांचे सासर राजस्थानच्या रायगड जिल्ह्यातील शेखावटी भागातील. त्यामुळे नव्वदच्या दशकात त्यांनी जेव्हा राजस्थानमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे हृदयद्रावक दृश्‍य टीव्हीवर पाहिले तेव्हा त्यांची या लोकांसाठी काही करण्याची इच्छा जागृत झाली. एक तत्कालीन निकड व सोय म्हणून अमलाजींनी त्यावेळी आपल्या सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी भागात टॅंकरने पाणीपुरवठा व भोजनाची व्यवस्था केली. दुष्काळी भागात परिणामकारक व कायमस्वरूपी काम करून तोडगा काढण्याच्या दृष्टीने विचार व प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
आपल्या या प्रयत्नांची सुरुवात अमलाजींनी आपल्या पूर्वजांचे परंपरागत गाव असणाऱ्या शेखावटी गावापासून केली. आपल्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी पारंपरिक पद्धतीने पाणी साठविण्याचा उपाय अशा स्वरूपात जलकुंभवजा शेततळे निर्माण केले. त्यानंतरच्या टप्प्यात म्हणजेच 2000 च्या सुमारास शेखावटी परिसरात सुमारे 200 शेतकऱ्यांच्या शेतात अशा प्रकारे शेततळी निर्माण केली. प्रत्येक शेततळ्यात साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघाली. पावसाने प्रत्येक शेततळ्यात 15 ते 50 हजार लिटर पावसाळी पाणी साठू लागले. त्यामुळे तेथे वर्षभर पाणी उपलब्ध होऊन त्याचा उपयोग स्त्रियांना घरकामासाठी व शेतकऱ्यांना शेतीसाठी होऊ लागला. शेततळ्यांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाल्याने शेतकऱ्यांसाठी वाढीव सिंचनक्षमता उपलब्ध झाली.
याशिवाय गाव सोडून नोकरी-रोजगारासाठी शहरात जाणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. रुईया यांनी आपल्या कामाचा वाढता व्याप लक्षात घेऊन ग्रामीण भागात जल-संचय, जल-सिंचनाच्या कामासाठी “आकार चॅरिटेबल ट्रस्ट’ नामक संस्था स्थापन केली आहे. जलसिंचनासाठी गावकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने आपल्या गावात काम सुरू केले असता संस्था त्यांना त्या प्रकल्पासाठी 30 ते 40% अर्थसहाय्य देते तर उर्वरित राशी गाववर्गणीतून जमविण्यावर भर दिला जातो. अमलाजींच्या “आकार’ संस्थेचा आकार व व्याप सतत वाढतच असून सध्या मूळ राजस्थानशिवाय महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा यासारख्या राज्यांमध्ये शेकडोंच्या संख्येने जलतळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचे महनीय काम या संस्थेद्वारा करण्यात आले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)