पिंपरी-चिंचवड पालिका, देहू कॅन्टोन्मेंटच्या नगरसेवकांची उपस्थिती
देहूरोड – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील शितळानगर येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविणे आणि विविध विकास कामानां गती मिळाण्यासाठी या कामांची गुरूवारी (दि. 16) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी व कॅन्टोन्मेट नगरसेवकाकडून पाहणी करण्यात आली.
पिंपरी महापालिका हद्दीवर आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत असलेल्या मामुर्डी शितळानगर येथील स्मशानभूमित विविध सोयीसुविधां अभावी देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसर व महापालिका हद्दीत किवळे, विकासनगर, मामुर्डी भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नगरसेवक विशाल खंडेलवाल यांनी विद्युत दाहिनी व विविध विकास कामांसाठी महापालिकेकडे विनंती करीत पाठपुरावा केल्यानंतर स्मशानभूमीत करावयाच्या कामांसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून विद्युत, डिझेल, गॅस दाहिनी कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, तत्कालीन महापौर नितीन काळजे यांच्याकडे मागणी केली होती. तत्कातीन उपमहापौर शैलजा मोरे यांनीही मागणीस शिफारस पत्र दिले होते.
आयुक्त व महापौरांनी या कामास तत्त्वतः मान्यता दिली. या विद्युत दाहिनी बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांच्या हस्ते तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. पाहणीसाठी नगरसेवक खंडेलवाल यांच्यासह अभियंता प्रवीण गायकवाड, महापालिका क्षेत्रीय अधिकारी दराडे, ठेकेदार आजवणी आदी उपस्थित होते.
सुमारे दीड कोटींचा खर्च
कॅन्टोन्मेंट बोर्डाने महापालिकेकडे कामाचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन शिवकुमार कन्स्ट्रक्शन यांना कामाचे आदेश दिले आहेत. महापालिकेने विद्युत दाहीनीसह विविध विकास कामासाठी 1 कोटी 66 लाख 38 हजार 531 रुपयांची तरतूद केली आहे. ठेकेदारास कामासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत महापालिकेच्या सहकार्याने नागरिकांसाठी प्रथमच विद्युत, डिझेल, गॅस दाहिनी सेवा उपलब्ध होणार आहे. या कामाला गती देण्याच्या सूचना पाहणी दरम्यान करण्यात आल्या.