नवी दिल्ली – गृहमंत्रालयाने बंगळुरू येथील इन्फोसिस फाऊंडेशनची मान्यता रद्द केली आहे. विदेशी देणग्यांबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विदेशी निधी घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी एफसीआरए अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार अशा स्वयंसेवी संस्थांनी आपले वार्षिक उत्पन्न आणि जमाखर्चाचा ताळेबंद सादर करणेही आवश्यक करण्यात आले होते.
पण इन्फोसिस फाऊंडेशनने आपले ताळेबंद सादर न केल्याने त्यांना गेल्या वर्षीच कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. त्यांनी गेल्या काही वर्षांचे हिशोब सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांची नोंदणीच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. ज्यांना एखाद्या वर्षात विदेशी निधी मिळाला नसेल त्यांनीही निधी मिळाला नाही असे नमूद करीत तो ताळेबंद सादर करणे एफसीआरए कायद्याअंतर्गत बंधनकारक आहे.
आमची संस्था एफसीआरए कायद्याअंतर्गत येतच नाही अशी भूमिका इन्फोसिस फाऊंडेशनने घेतली आहे. तशी भूमिका आम्ही गृहमंत्रालयाकडे मांडली होती व ती त्यावेळी त्यांनी ती मान्यही केली होती. त्याच वेळी आम्ही गृहमंत्रालयाचे आभारही मानले होते असे या संस्थेचे एक पदाधिकारीी श्रृषी बसू यांनी सांगितले.