माहिती-तंत्रज्ञान : ‘मिस्टर इंडिया’ बनणे शक्य होणार? (भाग २)

माहिती-तंत्रज्ञान : ‘मिस्टर इंडिया’ बनणे शक्य होणार? (भाग १)

महेश कोळी

कथा-कहाण्यांमध्ये जादूच्या सहाय्याने अदृश्‍य होण्याचे प्रसंग असतात. ते केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही आकर्षित करतात. खरोखर गायब होता आले तर..? असे रोमहर्षक स्वप्न अनेकांना पडते. त्यामुळेच जगभरातील शास्त्रज्ञही अशा एखाद्या तंत्रज्ञानाच्या किंवा पदार्थाच्या शोधात गुंतले आहेत, ज्याचा वापर करून अदृश्‍य होता येईल. या प्रयत्नांत काही प्रमाणात यशही मिळाले आहे. परंतु पूर्णपणे अदृश्‍य होण्याची किमया विज्ञानाला कधी करून दाखविता येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आतापर्यंत विज्ञानाच्या साह्याने काही असे पोशाख तयार करण्यात आले आहेत, जे परिधान केले असता संबंधित व्यक्ती दिसू शकत नाही. आपल्या पाहण्याच्या प्रक्रियेत प्रकाशकिरण त्या व्यक्तीच्या शरीराच्या आरपार जाऊ शकतात. याचा अर्थ असा की, त्या व्यक्तीचे शरीर दिसणार नाही. परंतु जो भाग खुला आहे, तो दिसणारच. आतापर्यंत माणसाला पूर्णपणे अदृश्‍य करणारा सूट तयार करण्यात यश आलेले नाही. परंतु अशा प्रकारचा सूट तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मेहनत पणाला लावली आहे, हेही खरे. ज्यातून प्रकाशकिरण आरपार जाऊ शकतात, असा पदार्थ शोधण्यात यश आल्यामुळे एके दिवशी माणूस संपूर्ण अदृश्‍य होण्यात यश मिळवेल, ही आशा या संशोधनामागे आहे. या पार्श्‍वभूमीवर हा पदार्थ नेमका काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

सामान्यतः हा असा पदार्थ आहे, जो आपल्या अणूंच्या मधून प्रकाशकिरण पलीकडे जाऊ देऊ शकतो. या पदार्थाचे हेच वैशिष्ट्य त्याला “अदृश्‍य पदार्थ’ म्हणून मान्यता देणारे ठरले आहे. या परिणामाला “इन्व्हिजिबल इफेक्‍ट’ नावाने ओळखले जाते. हे फ्लेक्‍सिबल मेटा मटेरियल असून, खास तंत्रज्ञान वापरून ते एखाद्या टणक पदार्थावर फिट केले जाते. आधार मिळताच हा पदार्थ आपल्या आतील अणू मोकळे करतो. अणू मुक्त होताक्षणी ज्या टणक पृष्ठभागावर हा पदार्थ फिट केलेला आहे, तो पृष्ठभाग गायब करण्यात हा पदार्थ यशस्वी होतो. कमी वेवलेन्थ हेच त्यामागील कारण आहे. या गुणधर्मामुळेच दहा वर्षांपेक्षाही आधी म्हणजे 2006 मध्ये अमेरिकेतील एका टीमने अशी घोषणा केली होती की, ते कोणताही पदार्थ अदृश्‍य करू शकतात. मेटाफ्लेक्‍स हा स्थितीस्थापकतेचा गुणधर्म असलेला पदार्थ थ्री डायमेन्शनल फ्लेक्‍सिबल मेटा मटेरियलपासून बनलेला आहे. हा पदार्थ अनेक मेटाफ्लेक्‍स अणू एकत्र करून तयार करण्यात येतो.
मेटाफ्लेक्‍स पदार्थाच्या साह्याने शास्त्रज्ञांनी आता असे एक घड्याळ विकसित केले आहे, जे वस्तूंना गायब करू शकते.

गायब झालेली वस्तू केवळ इन्फ्रारेड प्रकाशातच पाहता येते. तरीही हे तंत्रज्ञान अद्याप परिपक्व मानले जात नाही. कारण कोणत्याही धातूच्या वस्तूवर त्याचा परिणाम फारसा झाल्याचे दिसून आलेले नाही. ज्यावेळी हे तंत्रज्ञान धातूंच्या वस्तू गायब करू शकेल, तेव्हाच त्याला “इन्व्हिजिबल क्‍लॉक’ म्हणून ओळख मिळेल. त्यानंतर त्याच्यावर अनेक प्रयोग करण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल.

शास्त्रज्ञांनी आपल्या एका प्रयोगाच्या माध्यमातून ही शक्‍यता पडताळून पाहण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याला आलेले यश प्रभावी वाटते. हे क्‍लॉक बांधलेल्या माणसाला काही झाडांच्या समोर उभे करण्यात आले. त्यानंतर अनेक कॅमेऱ्यांच्या साह्याने हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, अशा प्रकारच्या मटेरियलचा पोशाख परिधान केला, तर माणसाच्या शरीराचा एखादा भाग दृष्टीस पडू शकतो का? शास्त्रज्ञांना या प्रयोगात सुखद धक्का बसला असून, पोशाख नखशिखान्त असल्यास कितीही प्रयत्न केला, तरी आतील माणूस दिसू शकत नाही, असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यांना या पोशाखाच्या पलीकडची झाडेच फक्त दिसत होती. या यशस्वी प्रयोगानंतरसुद्धा हे तंत्रज्ञान परिपक्व आहे, असे शास्त्रज्ञ मानत नाहीत. परंतु “मिस्टर इंडिया’मधल्या मोगॅम्बोला जो “फॉर्म्युला’ हवा होता, त्याच्या आसपास शास्त्रज्ञ पोहोचलेत, एवढे नक्की. हा फॉर्म्युला व्यावहारिक स्वरूप कधी धारण करतो आणि अदृश्‍य होण्याची आपली फॅण्टसी प्रत्यक्षात कधी उतरते, हेच आता पाहायचे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)