माहिती-तंत्रज्ञान : नववर्षात बोलबाला माहिती तंत्रज्ञानाचा

महेश कोळी (संगणक अभियंता) 

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पूर्वी कधीच घडल्या नाहीत, अशा अनेक गोष्टी नव्या वर्षात घडतील असे अपेक्षित आहे. हायटेक गॅजेट्‌सचा आणखी विस्तार होणार असून, तंत्रज्ञान सतत विकसित होत असल्यामुळे वेगवेगळी अपडेटेड व्हर्जन्स आणि अत्याधुनिक डिझाईनसह वेगवेगळ्या वस्तू बाजारात पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. नव्या वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या आणि टेक्‍नोसॅव्ही लोकांच्या उत्सुकतेचे केंद्र ठरलेल्या नव्या तंत्रज्ञानावर एक दृष्टिक्षेप… 

नव्या वर्षाची सुरुवात तर वाजतगाजत झाली. तंत्रमंत्राच्या या युगात लेटेस्ट तंत्रज्ञानाकडे सर्वांचेच डोळे लागलेले असतात. नवी पिढी तर टेक्‍नोसॅव्ही आहे. वेगवेगळी गॅजेट्‌स आणि अपडेटेड व्हर्जन्सनी पुरेपूर तंत्रज्ञान या पिढीला ज्ञात असते. तंत्रज्ञान विकसित होण्याचा वेग पाहिला असता, नव्या वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूपच आगेकूच होण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक नवनवीन गॅजेट्‌स लोकांच्या हातात पडणार आहेत. ही गॅजेट्‌स आपल्या जीवनावर सखोल परिणाम करणारी ठरतील, अशी शक्‍यता आहे. 2019 मध्ये तंत्रज्ञानाच्या दुनियेत सर्वाधिक चर्चा आणि उत्सुकता आहे फाइव्ह-जी नेटवर्कची. सॅमसंग, ओपो, व्हिवो, वनप्लस, शाओमी, एलजी यांसह अनेक कंपन्यांनी आपल्या फाइव्ह-जी फोनबद्दल माहिती दिलेली आहे. हे फोन 2019 च्या प्रारंभीच सादर केले जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतात अद्याप फाइव्ह-जी नेटवर्क उपलब्ध झालेले नसले, तरी 2019 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत फाइव्ह-जी नेटवर्कचा लिलाव होऊ शकतो. आपले नेटवर्क फाइव्ह-जी सुविधा पुरविण्यासाठी सज्ज असल्याची घोषणा एअरटेल आणि जिओसारख्या कंपन्यांनी आधीच केली आहे. त्यामुळे लिलावानंतर नेटवर्क सुरू होण्यास फारसा विलंब लागणार नाही.
इंटरनेटचा वेग पहिल्यापेक्षा आता कितीतरी वाढला आहे आणि इंटरनेटवर आधारित उपकरणांचे उत्पादनही जोरकसपणे सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत श्रीमंत देशांमध्ये “स्मार्ट होम’ ही संकल्पना खूपच लोकप्रिय झाली आहे. या संकल्पनेनुसार घरातील अनेक उपकरणे एकाच डिव्हाइसला जोडलेली असतात आणि एकमेकांशी संपर्क ठेवून काम करतात. उदाहरणार्थ मोबाइलशी ऑडिओ डिव्हाइस कनेक्‍ट करता येतो तर ऑडिओ डिव्हाइसशी टीव्ही, फ्रिज, बल्ब, गिजर, एसी आणि आरओपर्यंत अनेक उपकरणे जोडली जाऊ शकतात. नव्या वर्षात “स्मार्ट होम’ची संकल्पना तर आणखी विस्तारेलच; शिवाय या वर्षात “स्मार्ट स्पेस’ ही संकल्पनाही आकार घेईल, अशी चिन्हे आहेत. याखेरीज आपल्या हाती सध्या जसा स्मार्ट फोन आहे किंवा आपण स्मार्ट टीव्हीचाही वापर करू लागलो आहोत, त्याच धर्तीवर अनेक स्मार्ट उपकरणे 2019 मध्ये पाहायला मिळतील. स्मार्ट पेपर, स्मार्ट कॉपी, स्मार्ट बुक अशा काही प्रमुख वस्तूंबाबत मोठी उत्सुकता सर्वांना आहे.

संगणक किंवा लॅपटॉप वापरणारे अनेकजण अजूनही स्टॅंडर्ड की-बोर्ड, माउस किंवा ट्रॅकपॅडचा वापर करतात. मात्र टचस्क्रीन असलेल्या मोबाइल फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. संगणकासाठीही टचस्क्रीनची संकल्पना पुढे आली आहे. ऍपलने यापूर्वीच ओएलईडी पॅनेल बारसह मॅकबुक प्रो सादर केले आहे. त्याचप्रमाणे आसुस जेनबुकतर्फेही ओएलईडी टचस्क्रीन ट्रॅकपॅड सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी वर्षभराच्या कालावधीत बहुतांश कंपन्या की-बोर्ड आणि ट्रॅकपॅडसाठी टचस्क्रीन ओएलईडीचा वापर करतील, अशी शक्‍यता आहे. त्याचबरोबर सध्या लॅपटॉप घेऊन ज्यांना फिरावे लागते, त्यांना सोबत भलामोठा चार्जरही वागवावा लागतो. अशा स्थितीत “वायरलेस चार्जिंग’ची संकल्पना हितकारक ठरू शकते. अर्थात, लॅपटॉपची बॅटरी चार्ज करू शकेल, इतके सक्षम वायरलेस चार्जर अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनच्या फास्ट चार्जिंगला साह्यभूत असे काही वायरलेस चार्जर उपलब्ध झाले आहेत. आता कदाचित या चार्जरमुळे लॅपटॉपची बॅटरी चार्ज करणेही शक्‍य होईल. इन्टेल आणि डेल यांसारख्या काही कंपन्यांनी वायरलेस चार्जिंगचे प्रात्यक्षिक दाखविलेही आहे. या पार्श्‍वभूमीवर 2019 मध्ये लॅपटॉपसाठी वायरलेस चार्जर उपलब्ध होईल, अशी आशा अनेकजण बाळगून आहेत.

काही वर्षांपूर्वी मॉड्यूलर स्मार्टफोनचा बराच बोलबाला होता. गुगलसारखी कंपनीही या संकल्पनेवर काम करीत होती. परंतु काही वर्षे काम केल्यानंतर हा प्रकल्प गुगलने बंद केला होता. तथापि, आजही काही कंपन्या ग्राहकांसाठी बरीच मॉड्यूलर डिव्हाइस आणण्याच्या प्रयत्नात आहेत. उत्सुकता असणाऱ्यांसाठी फेयरफोन उपलब्ध आहे. मोटोसुद्धा स्मार्टफोनसोबत मोटो मोड्‌सच्या रूपाने असे पर्याय देते. 2018 मध्ये रेड कंपनीने मॉड्यूलर सपोर्ट ऍक्‍सेसरीजच्या सोबत येणाऱ्या हायड्रोजन फोनची घोषणा केली होती. दूरचित्रवाणी संचाच्या बाबतीत विचार करता, शाओमीने 2017 मध्ये मॉड्यूलर टीव्ही आणला होता. त्याचे अनेक भाग साउंडबारच्या आत होते. ते डिस्प्ले स्क्रीनपासून अलग करून त्याऐवजी अपग्रेडेड युनिट बसविता येणे शक्‍य होते. 2019 मध्ये मॉड्यूलर डिझाइनसह आणखीही काही डिव्हाइस बाजारात येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

2018 या वर्षात आर्टिफिशियल इन्टेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा सुरू होती. कॅमेऱ्यात तर एआय तंत्रज्ञानाचा वापर आपण पाहिलाच. परंतु आता मोबाइल उत्पादक कंपन्यांनीही एक खास एआय चिप तयार केली आहे. आपल्या दैनंदिन कामकाजातून ही चिप डेटा गोळा करते आणि आपल्या मदतीसाठी कायम तत्पर असते. उदाहरणार्थ, कोणत्या वेळी आपण कुठे जातो आणि त्यासाठी जवळचा मार्ग कोणता, हे सांगणे किंवा ज्या ऍपचा आपण सर्वाधिक वापर करतो, हे पाहून ते सर्वांत आधी सेट करणे अशी कामे ही चिप करते. एवढेच नव्हे तर कोणत्या वेळी आपण कोणते ऍप वापरतो, हेदेखील एआय चिप आपल्याला सांगू शकते. येणाऱ्या काळात एआयचा वापर आणि उपयुक्‍तता वाढतच जाईल, असे दिसते.

2018 मध्ये फोल्डेबल स्क्रीन असणारे फोन आणि रोलेबल टीव्ही अशी चमत्कृतीपूर्ण उपकरणे केवळ प्रदर्शित करण्यात आली होती. परंतु 2019 मध्ये ही उपकरणे वापरण्यासाठी उपलब्ध असतील. सॅमसंगने आपल्या फोल्डेबल फोनचे सादरीकरण 2019 च्या पहिल्या तिमाहीत करण्याची घोषणा केली आहे. अशाच प्रकारे रोलेबल स्क्रीन असणाऱ्या टीव्हीची सुरुवातही एलजीने केली आहे. जानेवारीतच हा गुंडाळी होऊ शकणारा टीव्ही आपल्या सेवेस हजर होईल. थोडक्‍यात, यावर्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे

फेरबदल अपेक्षित असून, अपडेटेड डिव्हाइस आणि चमत्कृतीपूर्ण उपकरणे आपल्या भेटीला येतील, हे निश्‍चित झाले आहे. आपल्या दैनंदिन जीवनावर या गॅजेट्‌सचा आणि डिव्हाइसचा सखोल परिणाम होणार असून, आपली दैनंदिनीच बदलून जाण्याच्या दिशेने प्रवास सुरू होत आहे. टेक्‍नोसॅव्ही पिढी या प्रवासासाठी स्वतःला सज्ज करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)