मुंबई – सासवड, दिवे, फुरसुंगी पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे तत्काळ सुरु करणार असून यासंदर्भातील आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सासवड, दिवे, फुरसुंगी पाणीपुरवठा योजनेसंबंधी आढावा बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. यावेळी लोणीकर बोलत होते. यावेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलारासू, सासवड नगरपालिकेचे पदाधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोणीकर म्हणाले, सासवड नगरपालिकेने पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करावा. त्यानुसार या योजनेचे काम त्वरित मार्गी लागेल. दिवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पुरंदर तालुक्यातील 8 गावे व 12 वाड्यांसाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. सदर योजनेसाठी 2030ची लोकसंख्या विचारात घेतली आहे. दिवे व फुरसुंगी या पाणीपुरवठा योजनांचा दुरुस्ती व संबंधित खर्च हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून करण्यात येणार असल्याची माहिती लोणीकर यांनी यावेळी दिली.