जाकार्ता – भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. तिने जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा 21-14, 21-7 असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. तिची आता चीनच्या चेन युई फेई हिच्याशी गाठ पडणार आहे.
अग्रमानांकित सिंधूने ओकुहाराविरूद्धच्या सामन्यात स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. पहिल्या गेममध्ये 6-6 अशा बरोबरीनंतर तिने आक्रमक खेळ करीत आघाडी वाढविली. तरीही ओकुहाराने चांगली झुंज दिली. सिंधूने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ करीत ही गेम घेतली. दुसऱ्या गेममध्ये तिने केलेल्या आक्रमक खेळापुढे ओकुहाराचा बचाव निष्फळ ठरला. सिंधूने सांगितले की, या सामन्यात माझा खेळ मनासारखा झाला. फेईविरूद्ध विजय मिळविण्याबाबत मी आशावादी आहे.