इंडोनेशियातील पूरामुळे 10 मृत्यूमुखी

जकार्ता – इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान 10 जण मृत्यूमुखी पडले आहेत आणि 8 जण बेपत्ता झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूराची तीव्रता लक्षात घेता सुमारे 12 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शेकडो इमारती, पूल आणि रस्त्यांचे या पूरामुळे नुकसान झाले आहे.

इंडोनेशियाच्या बेंगकुल्लू प्रांतातल्या सुमारे 9 जिल्ह्यांना या पूराचा फटका बसला आहे. अनेक नागरी वसाहतींमध्ये पूराचे पाणी शिरले आहे. आता पूर ओसरायला लागला आहे. मात्र तरिही नुकसान नेमके किती झाले, याचा अंदाज वर्तवला जाऊ शकत नाही. अनेक भागांमधील संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. या पूरामुळे झालेले नुकसान आणखी वाढू शकते असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.

जर संततधार पाऊस असाच सुरू राहिला, तर भूस्खलन आणि पूर पुन्ह संभवतात. विस्थापितांसाठी अनेक ठिकाणी आश्रय छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. इंडोनेशियामध्ये ऑक्‍टोबर एप्रिल महिन्यात अतिवृष्टीमुळे पूर येणे नित्याची समस्या आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)