नवी दिल्ली – इंडिगो विमान कंपनी चालविणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशन या कंपनीचा शेअर गुरुवारी नऊ टक्क्यांनी कोसळला. कंपनीच्या दोन प्रवर्तकात भविष्यातील कामकाजाबाबत मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त काही वृत्तमाध्यमांनी दिल्यामुळे या कंपनीचा शेअर कोसळला असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे आज या कंपनीचे बाजार मूल्य 5455 कोटी रुपयांनी कमी होऊन 56 हजार 377 IndiGoकोटी रुपयांवर आले. आज या कंपनीच्या 3.70 लाख शेअरची खरेदी विक्री झाली. या घटनाक्रमानंतर इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणोजय दत्ता यांनी सांगितले की, कंपनी उत्तमरित्या चालली आहे. त्याचबरोबर आगामी काळात ही कंपनी ठरविल्याप्रमाणे व्यवस्थित चालणार आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी नागरी विमान सेवा देणारी कंपनी आहे आणि भविष्यातही ती मजबूत होईल, असे दत्ता यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.
ठरविलेल्या सर्व योजनांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे दत्त यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र त्यांनी कंपनीच्या प्रवर्तकाचा दरम्यानच्या मतभेदावर कसलेही भाष्य केले नाही. दरम्यान कालपासून या कंपनीचे प्रवर्तक राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांच्यादरम्यान काही मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आपण आश्वस्त करीत आहोत, असे दत्ता यांनी सांगितले. मात्र, त्यांनी मतभेदाचा इन्कार केला नाही.
या विषयावर कंपनीने रात्री उशिरापर्यंत तरी कसलेही भाष्य केले नव्हते. या घडामोडीची मुंबई शेअरबाजाराने दखल घेतली आणि गंगवाल आणि भाटिया यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या मतभेदाच्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण करण्यास सांगितले. नंतर इंटरग्लोब एव्हिएशन या कंपनीने सांगितले की, वृत्तपत्रातील अशा बाबीवर टिप्पणी करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. याबाबत अधिक माहिती मिळाल्यास ती शेअरबाजारांना कळविण्यात येईल. या नकारात्मक घडामोडीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या कंपनीकडे लागले आहे.