भारताचा सलग दुसरा पराभव; अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2-5 ने विजय

मेलर्बन – भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडून 2-5 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताला कामगिरी उंचावता न आल्याने सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला.

ऑस्ट्रेलियाकडून ट्रेंट मिट्टन (11व्या आणि 24व्या मिनिटाला), फ्विन ऑगिलवि (तिसऱ्या मिनिटाला), ब्लेक गोवर्स (28व्या मिनिटाला) आणि टिम ब्रॅंड (43व्या मिनिटाला) यांनी गोल केले. भारताकडून निळकंठ शर्मा (12व्या मिनिटाला) आणि रुपिंदरपाल सिंग (53व्या मिनिटाला) यांनाच गोल करता आले.

पाहुण्या भारतीय संघाला पहिल्याच मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या ईडी ऑकेनडेन याने ती हाणून पाडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रतिआक्रमण करत भारताच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली. मात्र गोलरक्षक कृष्णन पाठकने यजमानांना यश मिळू दिले नाही. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला ऑगिलवि याने ऑस्ट्रेलियासाठी पहिला गोल केला.
भारताला आठव्या मिनिटाला पहिला पेनल्टीकॉर्नर मिळाला, पण निळकंठला चेंडूवर नियंत्रण न मिळवता आल्याने भारताने ही संधी वाया घालविली.

10व्या मिनिटाला भारतानेही ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी कॉर्नरवर केलेला प्रयत्न रोखला. 11व्या मिनिटाला गुरिंदर सिंगने चेंडूवरील नियंत्रण सुटल्यानंतर मिट्टन याने कोणतीही चूक न करता चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. मात्र भारतानेही पुढच्याच मिनिटाला जशास तसे उत्तर देत भारताचे खाते खोलले. निळकंठने हा गोल केला. 19व्या मिनिटाला मनदीप सिंगने मारलेला फटका गोलबारला लागून बाहेर गेला.

दुसरा गोल 24व्या मिनिटाला मिट्टनने केल्यानंतर पाच मिनिटांनी ब्लेक गोवर्सने ऑस्ट्रेलियाच्या खात्यात चौथ्या गोलची भर घातली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. टिम ब्रॅंड याने 43व्या मिनिटाला पाठकला चकवून गोल करत ऑस्ट्रेलियाला 5-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)