मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ः आचारसंहितेनंतर भरती प्रक्रिया राबविली जाणार
मान्यता मिळालेले सात अभ्यासक्रम
या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला आज (शुक्रवारी) मान्यता दिली. यामध्ये कान, नाक, घसा (तीन जागा), भूलशास्त्र (4), मानसोपचार (3), स्त्रीरोग आणि प्रसुती (3), बालरोग (4), विकृतीशास्त्र (3), अस्थिरोग (4) या सात अभ्यासक्रमांना आणि त्यासाठी 24 जागा भरण्यास मान्यता मिळाली आहे. एप्रिल महिन्यात या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये 12 जागा भारतभरातून तर 12 जागा महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. गुणवत्ता, शासकीय नियमानुसार या जागा भरण्यात येणार आहेत.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महत्वाकांक्षी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 3 जूनला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.
महापालिकेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आढावा बैठक आयुक्त हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.16) पार पडली. या बैठकीला पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. पद्माकर पंडित, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, मंगेश चितळे तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली. त्यामुळे “वायसीएम’मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 24 जागा भरण्यात येणार आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरू करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका भारतातील पहिली महापालिका आहे.
“वायसीएम’मध्ये औद्योगिकनगरीसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असते. त्यामुळे रुग्णांची अडचण होते. या ठिकाणी पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत. यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला होता.
आचारसंहितेनंतर होणार प्राध्यापक भरती
वायसीएमएच रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही कार्यान्वित आहे. या महाविद्यालयासाठी विविध 103 पदे मंजूर झाली आहेत. नवीन अभ्यासक्रमासाठी नऊ प्राध्यापक, 15 सहयोगी प्राध्यापक तसेच 21 सहायक प्राध्यापक अशी 45 पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आचारसंहितेनंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.