भारतीय युवा संघाचा श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय 

निर्णायक पाचव्या एकदिवसीय सामन्यात 8 गडी राखून मात 

मोराटुवा: गोलंदाजांची प्रभावी कामगिरी आणि यशस्वी जैस्वालचे शानदार नाबाद शतकामुळे भारतीय युवा संघाने श्रीलंकेच्या युवा संघाचा निर्णायक पाचव्या सामन्यात 8 गडी आणि 44 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतीय युवक संघाने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-2 अशी जिंकली. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निशान मदुश्‍का आणि नुवानिदु फर्नांडो यांच्या फलंदाजीच्या बळावर निर्धारित 50 षटकांत 9 बाद 212 धावा करत भारतापुढे विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना भारतीय युवा संघाने हे लक्ष्य यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकाच्या जोरावर केवळ 42.4 षटकांत 2 बाद 214 धावा फटकावून पार केले व पाचव्या एकदिवसीय सामन्यासह मालिका आपल्या नावे केली. 

विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला देवदत्त पडिक्‍कल आणि यशस्वी जैस्वाल यांनी आश्‍वासक सुरुवात करुन देताना 15.5 षटकांत 71 धावांची महत्त्वपूर्ण सलामी भागीदारी केली. आविष्का लक्षणने 38 धावांवर असलेल्या पडिक्‍कलला बाद करत लंकेला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर पवन शाह आणि जैस्वाल यांनी सावध पवित्रा घेत भारतीय युवक संघाला 125 धावांचा टप्पा ओलांडून दिला. 

हीच जोडी भारतीय युवा संघाला विजय मिळवून देणार, असे वाटत असताना लक्षिथ मानसिंगेने 36 धावांवर खेळत असलेल्या पवनला बाद करत ही भागीदारी संपुष्टात आणली. पवन शाह आणि यशस्वी जैस्वाल यांनी 13.2 षटकांत 72 धावांची बहुमोल भागीदारी करत भारतीय युवक संघाला 143 धावांपर्यंत मजल मारून दिली. 

त्यानंतर जैस्वाल आणि कर्णधार आर्यन जुयाल यांनी आणखीन एकही बळी न जाऊ देता भारतीय युवक संघाला विजय मिळवून दिला. यावेळी यशस्वी जैस्वालने 128 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 114 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा ऊचलला. तर जुयालने नाबाद 22 धावांची खेळी करत त्याला सुरेख साथ दिली. 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र लंकेच्या 32 धावा झाल्या असताना देव गौडने 17 धावांवर खेळणाऱ्या नावोद परनवितनाला बाद करत भारताला पहिला बळी मिळवून दिला. तर लागलीच समीर चौधरीने एका उत्कृष्ट फेकीवर श्रीलंकेचा कर्णधार निपुण धनंजयला बाद करत लंकेला दुसरा झटका दिला. त्यामुळे श्रीलंकेची बिनबाद 31 वरून 2 बाद 33 अशी छोटीशी घसरगुंडी उडाली होती. 

त्यानंतर दुसरा सलामीवीर निशान मदुश्‍का आणि नुवानिदी फर्नांडो यांनी संयमी खेळ करीत डाव सावरायला सुरूवात केली. दोघांनीही आपापले अर्धशतक पूर्ण करताना श्रीलंका युवक संघाला शंभरी पार करून दिली. मात्र संघाच्या 133 धावा झाल्या असताना 56 धावांवर खेळणाऱ्या नुवानिदी फर्नांडोला बाद करत हर्ष त्यागीने भारताला महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिला. फर्नांडो आणि मदुश्‍का यांनी 21 षटकांत 101 धावांची बहुमोल भागीदारी केली. 

फर्नांडो बाद झाल्यानंतर मदुश्‍काला दुसऱ्या बाजुने आवश्‍यक साथ मिळाली नाही त्यामुळे त्याला एकाकी लढत द्यावी लागली. मदुश्‍का आपले शतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच त्याला बाद करत मोहित जांगराने भारताला महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिला. त्यामुळे एकवेळ श्रीलंका 250 धावांचा टप्पा गाठेल असे वाटत असताना भारतीय गोलंदाजांनी त्यांना 212 धावांत रोखण्यात यश मिळवले. मदुश्‍काने 136 चेंडूंत 7 चौकारांसह 95 धावांची खेळी केली. मदुश्‍काला मालिकेचा मानकरी हा बहुमान देण्यात आला. 

संक्षिप्त धावफलक- 

श्रीलंका युवक संघ- 50 षटकांत 9 बाद 212 (निशान मदुश्‍का 95, नुवानिदी फर्नांडो 56, सूरियाबंदारा 20, मोहित जांगरा 30-2, समीर चौधरी 20-1) पराभूत विरुद्ध भारतीय युवक संघ- 42.4 षटकांत 2 बाद 214 (यशस्वी जैस्वाल नाबाद 114, देवदत्त पडिक्‍कल 38, पवन शाह 36, मानसिंगे 37-1, आविष्का लक्षण 38-1). 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)