भारतीय महिला हॉकी संघाची उपान्त्यपूर्व फेरीत धडक

महिला विश्‍वचषक हॉकी स्पर्धा इटलीवर 3-0 ने एकतर्फी मात

लंडन: भारतीय महिला हॉकी संघाने इटलीचे आव्हान 3-0 असे मोडून काढताना महिलांच्या विश्‍वचषक हॉकी स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. इटलीने गटसाखळी फेरीत सनसनाटी विजयाची नोंद करताना बाद फेरी गाठली होती. परंतु भारतीय महिलांनी त्यांची आश्‍चर्यकारक वाटचाल संपुष्टात आणली. आणखी एका सामन्यात यजमान इंग्लंडच्या महिला संघाने कोरियाचा 2-0 असा पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. इंग्लंडसमोर आता हॉलंडचे कडवे आव्हान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गटसाखळी फेरीत इंग्लंडविरुद्ध विजयाची संधी गमावणाऱ्या भारतीय महिलांना अमेरिकेनेही बरोबरीत रोखले होते. तरीही उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या भारतीय महिलांसमोर आता आयर्लंडचे जबरदस्त आव्हान आहे. साखळी फेरीत आयर्लंडकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याची भारतीय महिलांना या लढतीत संधी आहे. शुक्रवारी पहाटे 12-45 वाजता ही लढत रंगणार आहे.

विश्‍वक्रमवारीत 10व्या स्थानावर असलेला भारतीय महिला संघ आणि 17व्या क्रमांकावरील इटलीचा संघ यातील फरक स्पष्ट दिसत होता. चेंडूवरील नियंत्रणआणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपर्यंत धडक मारण्यातील सफाई यात भारतीय महिला संघ सरस होता. भारतीय महिलांनी पहिला पेनल्टी कॉर्नर लवकरच मिळविला. इटलीची गोलरक्षक इव्हाना पेसिनाने भारताचे आक्रमण परतवून लावले. परंतु लालरेमसियानीने पुढच्याच क्षणी भारताचा पहिला गोल करून इटलीवर दडपण आणले.

लालरेमसियामीने वंदना कटारियाने दिलेल्या पासवर 20व्या मिनिटाला हा गोल करताना इटलीविरुद्ध भारतीय महिलांचे खाते उघडले. लालरेमसियामीने अप्रतिम लक्ष्यवेध करताना हा मैदानी गोल केला. या गोलमुळे खडबडून जागे जालेल्या इटलीच्या महिला खेळाडूंनी भारतीय गोलवर आक्रमणाचा धडाकाच लावला. परंतु भारतीय बचावफळी आणि गोलरक्षक यांच्या जागरूकपणामुळे त्यांना यश मिळाले नाही.

भारतीय महिलांचे त्यानंतरचे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. त्यातील पहिला गोल 45व्या मिनिटाला करीत नेहा गोयलने भारतीय महिला संघाला 2-0 असे आघाडीवर नेले. त्यानंतर 55 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर तिसरा गोल करताना वंदना कटारियाने भारतीय महिला संघाच्या 3-0 अशा विजयाची निश्‍चिती केली. नवनीतला 56व्या मिनिटाला चौथा गोल करण्याची सोपी संधी मिळाली होती. यावेळी तिला केवळ इटालियन गोलरक्षकाला चकवायचे होते. परंतु नवनीतने थेट गोलरक्षकाच्या पॅडवरच चेंडू मारताना ही संधी दवडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)