सलग पाचव्यांदा भारतीय महिलांनी जिंकला सॅफ चषक

विराटनगर (नेपाळ) -“सॅफ’ महिला अजिंक्‍यपद फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग पाचव्यांदा विजेतेपदावर शिक्कामोर्तब करत “सॅफ’ स्पर्धेमध्ये सलग 23 सामने अपराजित राहण्याचा विक्रम केला. यावेळी अंतिम सामन्यात भारताने नेपाळला 3-1 असे पराभूत करत विजेतेपद आपल्या नावे केले.

सामन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक धोरण स्वीकारले होते. मात्र, दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी गोल रोखण्यात यश मिळवल्याने सुरुवातीला दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र, सामन्याच्या 26 व्या मिनिटाला दालिमा छिब्बरने संघाला मिळालेल्या फ्री किकचा लाभ उठवत 30 यार्डवरून गोल लगावत भारताचे खाते उघडत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या सहाच मिनिटांनी भारताच्या रत्नबालादेवीचा गोलमध्ये जाणारा फटका नेपाळच्या गोलीने वाचवल्याने दुसरा गोल रोखला गेला. त्यानंतर सामन्याच्या 34व्या मिनिटाला नेपाळच्या सबित्राने गोल करीत बरोबरी साधली. त्यामुळे मध्यंतराला दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.

उत्तरार्धात भारतीय महिलांनी खूप आक्रमक खेळ करीत अधिक संधी निर्माण केल्या. त्यामुळे सामन्याच्या 63व्या मिनिटाला संधी साधत संजूने दिलेल्या पासवर ग्रेस डांगमेइने भारतासाठी दुसरा गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बदली खेळाडू म्हणून आलेल्या अंजू तमांगने सामन्याच्या 78व्या मिनिटाला इंदुमती काथिरेसानने दिलेल्या पासवर गोल करत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

अंतिम टप्प्यात नेपाळने अनेक आक्रमणे करीत गोल करण्याचे निष्फळ प्रयत्न केले. मात्र, भारतीय बचावफळीने सुरेख खेळ करताना त्यांची सर्व आक्रमणे परतवून लावल्याने भारताने 3-1 अशा दणदणीत विजयासह जेतेपदावर नाव कोरले. यावेळी, भारतीय महिलांपैकी दालिमा छिब्बर आणि ग्रेस डांगमेइ आणि अंजू तमांग यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

https://twitter.com/IndianFootball/status/1109296207287902211

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)