#INDVNZ : भारतीय महिलांचा दणदणीत विजय

-स्मृत्ती मंधनाची तडाखेबाज शतकी खेळी
-जेमिमा रॉड्रिक्‍झचे अर्धशतक
-एकता बिश्‍त आणि पूनम यादवची भेदक गोलंदाजी
-न्यूझीलंडमध्ये 13 वर्षांनी विजय

नेपियर  – भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड येथील एकदिवसीय क्रिकेट दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. असून, पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय महिलांनी न्युझिलंडच्या संघापेक्षा सरस कामगिरी करत पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. पहिल्या सामन्यातील विजयामुळे 2006 नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडला 48.4 षटकांत सर्वबाद 192 धावांचीच मजल मारता आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना भारतीय महिला संघाने हे आव्हान 33 षटकांत 1 गडी गमावत 193 धावाकरुन पुर्णकरत सामना आपल्या नावे केला असून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात सलामीवीर स्मृती मंधना आणि जेमीमा रॉड्रीक्‍झया दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक पद्धतीने केली. दोन्ही सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चौफेर फटकेबाजी करत धुलाई केली. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 8.4 षटकांतच संघाचे अर्धशतक फलकावर झळकावले. तर, पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाला 53 धावांची मजल मारुन दिली. तर, पॉवरप्लेनंतर थोड्याच वेळात स्मृतीने 43 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक झळकावले. यावेळी मंधना एका बाजुने फटकेबाजी करत असताना जेमीमा सावधपणे तिची साथ देत होती. त्यामुळे भारताने 17.3 षटकांतच शतकी वेस ओलांडली. यावेळी जेमीमा 41 तर मंधना 58 धावांवर खेळत होती.

तर, भारतीय संघाने शतकी वेस पार केल्यानंतर थोड्याच वेळात जेमीमाने आपले एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले वाहिले अर्धशतक पुर्ण केले. यानंतर दोन्ही सलामीवीरांनी आपल्या धावांचा वेग वाढवताना पहिल्या गड्यासाठी तब्बल 190 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधानाने या खेळीदरम्यान आपले चौथे शतक झळकावले. 120 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने स्मृतीने 105 धावा फटकावल्या. मात्र, विजयासाठी केवळ 3 धावा हव्या असताना मंधना माघारी परतली. यानंतर विजयासाठीची औपचारिकता जेमीमा आणि दिप्ती शर्मा या जोडीने पूर्ण करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या एकता बिस्त आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 192 धावांवरच माघारी धाडला. त्यांना दिप्ती शर्मा 2 आणि शिखा पांडेने 1 गडी बाद करत सुरेख साथ दिली. यावेळी न्यूझीलंडकडून सुझी बेट्‌सने सर्वाधिक 36 धावा केल्या. मोक्‍याच्या क्षणी मोठ्या भागीदाऱ्या होउ न शकल्याने न्युझीलंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

न्यूझीलंडने जिंकून दिला सामना

भारताला विजयासाठी केवळ 3 धावांची गरज असताना स्मृती मंधना बाद झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दिप्ती शर्माला एकही चेंडू खेळता आला नाही. जेमिमाने 33 व्या षटकांतील चौथ्या चेंडूवर दुहेरी धावा घेऊन धावांची बरोबरी केली. पुढच्या षटकांत दिप्ती शर्मा विजयाची औपचारिकता पूर्ण करणार असे वाटत असताना न्यूझीलंडच्या हना रॉने पहिलाच चेंडू वाईड टाकला आणि भारतीय संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब झाला.

संक्षिप्त धावफलक

न्युझीलंड महिला संघ – 48.4 सर्वबाद 192 (सुझी बेट्‌स 36, सोफी डिव्हाईन 28, ऍमी सॅटरवेट 31, अमेलि केर 28, एकता बिश्‍त 32-3, पूनम यादव 42-3) पराभुत विरुद्ध भारत महिला संघ 33 षटकांत 1 बाद 193 (स्मृती मंधना 105, जेमीमा रॉड्रीक्‍झ नाबाद 81, अमेली केर 33-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)