इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याची भारतीय महिलांना संधी

अखेरचा सामना जिंकून 2 गुण घेण्यासाठी इंग्लंड सज्ज

मुंबई: भारत आणि इंग्लंड महिला संघांदरम्यान होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने एकतर्फी जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यातही इंग्लंडचा पराभव करुन त्यांना व्हाईटवॉश देण्याची संधी भारतीय महिला संघाकडे असून अखेरच्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी चॅम्पियनशीपसाठी दोन गुण मिळवण्यास इंग्लंडचा संघ उत्सूक आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला एकतर्फी पराभुत केले. ज्यात सलामीवीरांनी चांगली कामगिरी नोंदवली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आला. यावेळी पहिल्या सामन्यात भारताच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावांचा आकडा गाठता आल्यानंतरही भारताने 200 धावांची मजल मारली. यावेळी जेमिमा रॉड्रीग्जने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. तर, दुसऱ्या सामन्यात आघाडीची फलंदाज स्मृती मंधनाने सर्वाधिक 63 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरूवात करुन दिली. यावेळी पहिल्या सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करत उपयुक्त भागिदाऱ्यांची नोंद करत संघाला विजय मिलवून दिला.

तर, दोन्ही सामन्यात भारतीय संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे भारतीय गोलंदाजांनी केलेली चांगओली कामगिरी होय. पहिल्या सामन्यात विश्‍वचषक विजेत्या इंग्लंडसमोर भारतीय संघाने केवळ 202 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी तिखट मारा करत इंग्लंडच्या महिला संघाला केवळ 136 धावांमध्येच गुंडाळत भारताला 66 धावांनी विजय मिळवून दिला. यावेळी भारताकडून एकता बिश्‍तने केवळ 25 धावा देत 4 गडी बाद करत इंग्लंडच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.

तर, दुसऱ्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ टिकाव धरु दिला नाही. ज्यात शिखा पांडे आणि झुलन गोस्वामीयांनी प्रत्येकी 4 गडी बाद करत इंग्लंडला केवळ 161 धावांमध्येच रोखण्याचा भीम पराक्रम केला. यावेळी भारतीय संघाने हे आव्हान केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण करत मालिकेत 2-0 अशा फरकाने विजयी आघाडी मिळवली.

त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज कितीकाळ टिकाव धरु शकतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. त्याच बरोबर टी-20 सामन्यांच्या मालिकेपुर्वी आजच्या सामन्यात विजय मिळवून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मालिकेत उतरण्याच्या दृष्टीने आजचा सामना भारत आणि इंग्लंड महिला संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), झुलन गोस्वामी, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), आर. कल्पना, मोना मेश्राम, एकता बिश्‍त, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, शिखा पांडे, मानसी जोशी, पूनम राऊत, हरलीन देओल.
इंग्लंड महिला संघ – हिथर नाईट (कर्णधार), टॅमी बेअमॉन्ट, कॅथरीन ब्रन्ट, केट क्रॉस, सोफिया डंकले, सोफी एसील्सस्टोन, जॉर्जिया एल्विस, ऍलेक्‍स हार्टले, एमी जोन्स, लॉरा मार्श, अन्या श्राबसोल, साराह टेलर, नताली स्किवर, लॉरेन विनफिल्ड आणि डॅनीएली वॅट.

स्थळ – मुंबई
वेळ – स. 9.00 वाजता

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)