भारतीय महिलांचा दक्षिण कोरियावर 2-1 ने विजय

जिनचियोन (कोरिया) – भारतीय महिला हॉकी संघाने एका गोलच्या पिछाडीनंतरही मुसंडी मारताना बुधवारी दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियावर 2-1 असा शानदार विजय मिळवला. यासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या हॉकी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने कोरियाचा याच फरकाने पराभव केला होता. उभय संघांदरम्यान तिसरा आणि अखेरचा सामना आज रंगणार आहे.

भारताकडून कर्णधार राणी रामपाल हिने 37 व्या आणि नवज्योत कौरने 50 व्या मिनिटाला गोल केला. कोरियाकडून 19 व्या मिनिटाला ली स्युंगजू हिने मैदानी गोल नोंदवून खाते उघडले होते. दोन्ही संघांनी सुरुवात आक्रमक केली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले. तथापि उभय संघाच्या गोलकीपरने परस्परांचे मनसुबे उधळून लावल्याने दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच कोरियाने खाते खोलले. सेउंगजू हिने दुसऱ्या क्वॉर्टरच्या चौथ्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करत आपल्या संघाला आघाडीवर आणले. कोरियाने गोल नोंदविताच मध्यंतरापर्यंत यजमान संघ 1-0 ने आघाडीवर होता. त्यानंतर राणीने 37 व्या मिनिटाला गोल करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर भारतीय खेळाडूंनी कोरियावर दडपण कायम राखले. याचा लाभ घत नवज्योतने 50 व्या मिनिटाला गोल नोंदविला. तिचा हा गोल निर्णायक ठरला आणि भारतीय संघाने हा सामना 2-1 अशा फरकाने आपल्या नावे केला. उभय संघांमधील पहिला सामना भारताने 2-1 अशा फरकानेच जिंकला होता. आता अखेरचा सामना शुक्रवारी खेळवण्यात येईल.

“आमची कामगिरी पहिल्या सामन्याच्या तुलनेत खूप सरस होती. खेळावर संपूर्ण नियंत्रण होते. सातत्य असल्याने खेळाचा दर्जा चांगला होता. आम्ही अधिक गोल नोंदवू शकलो असतो, पण असो, संघाचे प्रयत्न आणि समर्पित भावना उच्च दर्जाची होती, असे म्हणावे लागेल.
– शोर्ड मारिन, मुख्य प्रशिक्षक – भारत

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here